दक्षिण आफ्रिका येथे खेळला गेलेला पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावे केला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत विश्वचषक उंचावला. भारतीय महिला क्रिकेटसाठी हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच घोषित झालेल्या वुमन्स प्रीमियर लीग (WPL) या स्पर्धेतही या संघातील काही खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते.
महिला आयपीएल अर्थात डब्लूपीएल मार्च महिन्यात खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो. अंडर 19 टी20 विश्वचषकात भारताच्या वरिष्ठ संघातील शफाली वर्मा व रिचा घोष या खेळाडू देखील होत्या. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त काही अशा खेळाडू राहिल्या ज्यांनी सर्वांची वाहवा मिळवली. त्याच चार खेळाडूंवर या डब्लूपीएलमध्ये तगडी बोली लागण्याची शक्यता आहे.
श्वेता सेहरावत-
सर्वांची नजर शफाली वर्मावर असताना तिच्यासोबतच सलामीला येत स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान दिल्लीच्या श्वेता सेहरावतने मिळवला. तिने स्पर्धेत तब्बल 99 च्या सरासरीने 297 धावा कुटल्या. आक्रमक आणि जबाबदारीने खेळ करत तिने भविष्यात मोठी खेळाडू होण्याची झलक दाखवली आहे. त्यामुळे तिच्यावर डब्लूपीएल लिलावात सर्व संघांची नजर असेल.
पार्श्वी चोप्रा-
लेगस्पिनर पार्श्वी चोप्रा ही विश्वचषकात सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. उपांत्य फेरी व अंतिम फेरीत तिने उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा दाखवला. 6 सामन्यात 11 बळी तिने टिपले. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना मदत होत असल्याने, डब्लूपीएल लिलावात तिला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी अनेक संघ तयार असतील.
अर्चना देवी-
पार्श्वी प्रमाणेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारी अर्चना एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखली गेली. भारताचा पुरुष क्रिकेटपटू कुलदीप यादव यांच्याच प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेणारी अर्चना ऑफ स्पिन गोलंदाजीसह एक दर्जेदार क्षेत्ररक्षक तसेच उपयोगी फलंदाज देखील आहे. या स्पर्धेत आठ बळी तिने आपल्या नावे त्यामुळे अनेक संघ तिच्यासाठी बोली लावताना दिसू शकतात.
टिटस साधू-
इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेली वेगवान गोलंदाज टिटस साधू हिचे अनेकांनी कौतुक केले आहे. तिची चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करण्याची क्षमता पाहून, तिला अनेकांनी भविष्यातील झूलन गोस्वामी असे देखील म्हटले. वेग आणि स्विंग अशा दोन्ही गोष्टी तिच्या भात्यात आहेत. त्यामुळे डब्लूपीएल लिलावात ती मोठी रक्कम घेऊ शकते.
(These Four Girls From U19 T20 World Cup Winning Sqaud Will Earn Much In WPL Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाळिशी पार करणारा शोएब मलिक घेणार नाही निवृत्ती; म्हणाला, ‘मी 25 वर्षांच्या खेळाडूपेक्षा जास्त फिट…’
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स