तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, त्यासाठी तुम्ही आपले समस्त जीवन अर्पण केले असेल तर, तुमचा यथायोग्य सन्मान नक्कीच केला जातो. आपल्या क्रिकेटचच उदाहरण घेतलं तर दरवर्षी आयसीसी आणि प्रत्येक क्रिकेट बोर्ड चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटर्सना सन्मानित करत असते. मात्र, अशाच प्रकारचे सन्मान आणि पुरस्कार आपल्या देशाकडून आणि देशाच्या सरकारकडून मिळाल्यावर क्रिकेटर्सची मान अभिमानाने उंचावते. भारतीय क्रीडा क्षेत्रात योगदान दिल्यावर अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांच्यासारखे पुरस्कार अनेकांना दिले गेलेत. मात्र, देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न मिळण्याच सौभाग्य केवळ सर्वकालीन महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला लाभले.
सचिनला त्याच्या रिटायरमेंटच्या दिवशीच या पुरस्काराने गौरवण्यात आलेले. क्रीडा जगतात भारतरत्न मिळवणारा तो एकमेवाद्वितीय ठरला. त्याच्यामुळे क्रीडा जगतात भारतरत्न देण्यास सुरुवात झाली. आजच्या या लेखामध्ये आपण अशा भारतीय क्रिकेटर्सबाबत जाणून घेऊ ज्यांना कदाचित भविष्यात भारतरत्न पुरस्कार मिळू शकतो.
सुनील गावसकर
क्रिकेटविश्वात भारतीय क्रिकेटचे नाव सन्मानाने घेण्यास ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ते म्हणजे लिटल मास्टर सुनील गावसकर. सुनील गावसकर हेच पहिले असे क्रिकेटर होते ज्यांनी डॉन ब्रॅडमन यांचे अनेक विक्रम जमीनदोस्त केले. अगदी निर्भीडपणे हेल्मेट न घालता वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सचा यशस्वी सामना त्यांनी केला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा दहा हजार रन्स करण्याची किमयाही त्यांनीच केली. आज वयाची पंच्याहत्तरी पार करून गेलेले गावसकर जागतिक क्रिकेटमधील सर्वात आदरार्थी नाव आहे. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानासाठी १९८० मध्येच पद्मभूषण या तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. भविष्यात क्रिकेटरला भारतरत्न पुरस्कार द्यायचा झाल्यास सुनील गावसकर यांच्या नावाचा पहिल्यांदा विचार केला जाऊ शकतो.
कपिल देव
सुनील गावस्कर यांच्यापाठोपाठ या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी दुसरी पात्र व्यक्ती म्हणजे कपिल देव होय. क्रिकेटविश्वात भारतीय क्रिकेटची ओळख एक लिंबू टिंबू संघ असताना, १९८३ वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाची धुरा कपिलदेव यांच्याकडे आली होती. या आधीच्या दोन वर्ल्डकपमध्ये केवळ हजेरी लावण्याचे काम केलेल्या टीम इंडियामध्ये कपिल देव यांनी जान फुंकली. आपल्या करिष्माई कॅप्टन्सी व अलौकिक अशा ऑलराउंड खेळाच्या जोरावर त्यांनी टीम इंडियाला तो वर्ल्ड कप जिंकून दिला. सर गॅरी सोबर्स, सर इयान बोथम यांच्यासह कपिल देव यांच्याकडे क्रिकेट जगतातील सर्वोत्तम ऑलराऊंडर म्हणून पाहिले जाते. कपिल देव हे अजूनही अनेक सामाजिक कार्यांमध्ये अग्रस्थानी असतात. भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देखील त्यांना मिळालीये. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट असलेल्या कपिल देव यांना भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण हे सन्मान मिळालेत. भविष्यात भारतरत्न पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचा निश्चित विचार होऊ शकतो.
एमएस धोनी
केवळ भारतीय क्रिकेटच नव्हेतर जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून एमएस धोनीचे नाव एकमुखाने घेतले जाईल. बॅटिंगमधील अनेक रेकॉर्ड नावावर असतानाच धोनीने आयसीसीच्या तीनही ट्रॉफी कॅप्टन म्हणून जिंकण्याची असाधारण कामगिरी करून दाखवलीये. त्याचबरोबर सामाजिक कार्यातील त्याची आघाडी, टेरिटोरियल आर्मी लेफ्टनंट कर्नल पदावर असताना सीमेवर जाऊन जवानांसोबत राहणे या गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळ्या बनवतात. धोनीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळालेत. त्याचबरोबर भारत सरकारने खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण हे नागरी पुरस्कार देत आजपर्यंत त्याचा यथायोग्य सन्मान केलाय. भविष्यात धोनीला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यास आश्चर्य नक्कीच वाटायला नको.
विराट कोहली
आज क्रिकेटजगतातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून जगभरात डंका वाचतो तो म्हणजे भारताचा माजी कॅप्टन विराट कोहली. आज क्रिकेटमधील बहुतांशी विक्रम त्याच्याच नावे जमा आहेत. विराटसमोर आणखी चार-पाच वर्षांचे करियर आहे. अशात तो सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडून क्रिकेटचा नवा विक्रमादित्य होऊ शकतो. त्याची आजपर्यंतची ही धडाकेबाज कामगिरी पाहता त्याला क्रिकेटजगतातील सर्वच नामांकित पुरस्कार मिळालेत. सोबतच भारत सरकारने अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री व खेलरत्न पुरस्कार देत त्याच्या कामगिरीचा गौरव केलाय. विराटने आपल्या उर्वरित करिअरमध्ये आणखी काही मैलाचे दगड पार केल्यास, नक्कीच भविष्यात त्याचा भारतरत्न पुरस्कारासाठी विचार होऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चल हवा येऊ दे! रूडचा मूड ऑफ करत नदालने पुन्हा दाखवून दिले, ‘आपणच आहोत लाल मातीचे बादशाह’
रणजी ट्रॉफीसाठी खेळाडूंचं सिलेक्शन होतं तरी कसं, काय खटाटोप करावा लागतो? जाणून घ्या एका क्लिकवर
राजस्थानचा ‘रॉयल’ रियान पराग इतका डोक्यात का जातोय? IPLच्या सामन्यात समालोचकांकडूनही खाल्लाय ओरडा