भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवार (23 मार्च) पासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचा दुसरा सामना 26 मार्च आणि तिसरा सामना 28 मार्च रोजी खेळला जाईल. टी-20 मालिकेप्रमाणेच वनडे मालिकेतही भारत-इंग्लंड संघातील खेळाडू आपल्या प्रदर्शनाची छाप सोडण्याचा प्रयत्न करतील. अशात या मालिकेत ‘मालिकावीर’ म्हणून ठरू शकतात, अशा 3 खेळाडूंबद्दल आम्ही तुंम्हाला सांगणार आहोत.
1. विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी -20 मालिकेत मालिकावीर हा पुरस्कार जिंकला होता. त्याने 5 सामन्यांत 115.5 च्या सरासरीने आणि 147.13 च्या स्ट्राइक रेटने एकूण 231 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने भारतीय संघासाठी 3 अर्धशतकेही ठोकली.
टी-20 मालिकेप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी चालू ठेवायला त्याला आवडेल. सध्या तो एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर एकचा फलंदाज आहे. अशा स्थितीत तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही मालिकावीरचा सर्वात मोठा दावेदार असू शकतो.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 251 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 59.3 च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण 12040 धावा केल्या आहेत.
2. बेन स्टोक्स
बेन स्टोक्स हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे, जो फलंदाजीसह गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाद्वारे संघात मोठे योगदान देतो. टी -२० मालिकेतही त्याने तिन्ही विभागात इंग्लंडकडून चांगली कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेट हे या खेळाडूचे आवडते स्वरूप आहे.
इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 95 एकदिवसीय सामन्यांमध्ये 40.64 च्या सरासरीने 2682 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने एकदिवसीय कारकीर्दीत 70 बळीही घेतले आहेत. त्याच्या प्रभावी विक्रमाकडे पाहता असे म्हणता येईल की बेन स्टोक्सही या एकदिवसीय मालिकेत मालिकावीर पदवी जिंकू शकतो.
3. रोहित शर्मा
रोहित शर्मा हा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील टॉप-२ मधील फलंदाज आहे. गोलंदाजांना एकदिवसीय स्वरूपात या खेळाडूला रोखणे फार अवघड जाते. या सलामीवीर फलंदाजाने आतापर्यंत 224 एकदिवसीय सामन्यात 49.3 च्या सरासरीने एकूण 9116 धावा केल्या आहेत. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीमध्ये त्याने 29 शतके आणि 43 अर्धशतके झळकावली आहेत.
मालिकेच्या शेवटच्या टी -२० सामन्यात रोहित शर्माने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते पाहता असे म्हणता येईल की तो वनडे मालिकेतही गोलंदाजांवर भारी पडणार आहे. त्यामुळे हा खेळाडू देखील त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे निश्चितच ‘मालिकावीर’ ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! इंग्लंडविरुद्ध कृणाल पंड्यासह ‘या’ भारतीय खेळाडूने केले वनडे पदार्पण
तब्बल ६१८ दिवसांनंतर एकहाती सामना जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय वनडे कमबॅक, भारताला भरवणार धडकी!