क्रिकेटमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकीर्दीमध्ये असा एक दिवस येतोच की त्याला त्याच्या कारकीर्दीला निरोप द्यावा लागतो. असे बरेच क्रिकेटपटू आहेत जे आपल्या कारकिर्दीत भरपूर यश मिळाल्यानंतर समाधानाने निवृत्त होतात आणि असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांना काही कारणास्तव त्यांची कारकीर्द मधेच सोडावी लागते. यातील काही क्रिकेटपटू असे आहेत जे निवृत्तीनंतरही त्यांच्यातील कौशल्याच्या जोरावर आजही क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करु शकतात. या लेखातही अशा ५ क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊ ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु त्यांच्याकडे आजही चांगली कामगिरी करण्याची क्षमता होती किंवा ते अजूनही चांगली कामगिरी करू शकले असते.
ते ५ निवृत्त झालेले क्रिकेटपटू आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करू शकले असते…
१. युवराज सिंग (Yuvraj Singh)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने आपल्या कारकीर्दीत भारतीय संघाला अतुलनीय योगदान दिले आहे. युवराज सिंगची संपूर्ण कारकीर्द चांगलीच राहिली असून त्याने दमदार कामगिरीने भारतीय क्रिकेट संघाला अनेक विजय मिळवून दिले. युवराज सिंगने २००७ टी-२० आणि २०११ वनडे विश्वचषकात भारतासाठी महत्वाची भूमिका निभावली होती. परंतु गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली. जर युवराज सिंग आजही खेळत असता तर अजून चांगला क्रिकेट खेळाला असता, आणि त्याच्याकडे अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता होती पण तो निवृत्त झाला.
त्याने भारतीय संघाकडून ४० कसोटी सामने, ३०४ वनडे सामने आणि ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटी १९००, वनडेत ८७०१ आणि टी२०त ११७७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १३० हून आधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.
२. डेल स्टेन (Dale Steyn)
क्रिकेट विश्वातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन. त्याच्या तुफानी वेगवान गोलंदाजीपुढे सर्वोत्कृष्ट फलंदाजानीही गुडघे टेकले. मागील काही वर्षभरात डेल स्टेन दुखापतीने त्रस्त असतानाही त्याची मैदानात उतरण्याची जिद्द दिसून आली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टेनने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता स्टेनकडे अजूनही होती.
त्याने आतापर्यंत एकूण ९३ कसोटी सामने, १२५ वनडे सामने आणि ४७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २२.९५ च्या सरासरीने ४३९ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने २५.९५ च्या सरासरीने १९६ विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने १८.३५ च्या सरासरीने ६४ विकेट्स घेतल्या आहेत.
३. एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers)
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. त्याचा जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये समावेश आहे. एबी डिव्हिलियर्समध्ये एवढी क्षमता आहे की, तो कोणत्याही परिस्थितीत सामना खेचून आणू शकतो आणि संघाला विजय मिळवून देऊ शकतो. पण २०१८ च्या आयपीएलनंतर त्याने वयाच्या ३४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. यानंतरही तो लीग क्रिकेटमध्ये अजूनही खेळत असून चमकदार कामगिरीही करत आहे. त्याच्या कामगिरीवरून हे स्पष्ट आहे की त्याच्याकडे अजूनही बरेच क्रिकेट बाकी आहे आणि तो आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असता तरी त्याने शानदार कामगिरी केली असती.
३६ वर्षीय डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ११४ कसोटी सामने आणि २२८ वनडे सामने आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २२ शतकांच्या मदतीने ८७६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्याने २५ शतकांच्या मदतीने ९५७७ धावा केल्या आहेत, तर टी२०त त्याने १६७२ धावा केल्या आहेत.
४. हाशिम आमला (Hashim Amla)
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे गेल्या काही वर्षांत बरेच दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत. वर्षानुवर्षे दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली कामागोरी करणाऱ्या अनेक खेळाडूंनी एका-मागोमाग एक निवृत्ती घेतली. या खेळाडूंमध्ये अनुभवी फलंदाज हशिम अमलाच्याही नावाचा समावेश आहे. तीनही प्रकारात दक्षिण आफ्रिकेसाठी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या हाशिम अमलाची कारकीर्द खूपच प्रभावी आहे. पण गेल्या वर्षी हाशिम अमलाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप दिला. त्याच्याकडे अजूनही चांगली कामगिरी करण्याची क्षमता होती.
हाशिम आमलाने त्याच्या कारकीर्दीत १२४ कसोटी सामन्यात ४६.४१च्या सरासरीने ९२८२ धावा केल्या आहेत. तसेच, १८१ वनडे सामन्यात ४९.४७ च्या सरासरीने ८११३ धावा केल्या आहेत, तर, ४४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ३३.६१ च्या सरासरीने १२७७ धावा केल्या होत्या.
५. पीटर सिडल (Peter Siddle)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात अनेक महान वेगवान गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाजीसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ खूप भाग्यवान आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून वेगवान गोलंदाज पीटर सिडलही या संघात खेळत होता. पीटर सिडलकडे जबरदस्त गुणवत्ता होती. पण सिडलला त्याच्या कारकिर्दीत सतत खेळण्याची संधी मिळाली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्थान गमावल्यानंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली. परंतु तिथेही त्याला सतत्याने संधी मिळत नव्हती. अखेर, सिडलने २०१९ मध्ये निवृत्तीची घोषणा केली. सिडलमध्ये अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी करण्याची क्षमता आणि जिद्द होती.
त्याने ६७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने २२१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यानो २० वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने १७ विकेट्स घेतले आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पीटरने केवळ २ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
वाचनीय लेख –
वनडे सामन्यात एकही विकेट न घेता सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज
जसप्रीत बुमराहचे ते ४ नो-बॉल, जे भारतीय संघाच्या विजयात ठरले अडसर
सर्वात कमी वयात कसोटी सामन्यातील पहिला चेंडू खेळणारे जगातील ४ क्रिकेटर