यावर्षीची रणजी ट्रॉफी पाच दिवसांवर आली आहे. या स्पर्धेत आर. अश्विन, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा यांसारखे स्टार खेळाडू खेळण्याची दाट शक्यता आहे. ६ ऑक्टोबर पासून रणजी ट्रॉफीचे सामने सुरु होणार आहेत.
आर. अश्विन आणि चेतेश्वर पुजारा हे इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा अश्विनसाठी चांगलीच यशस्वी झाली होती. तसेच, काही दिवसांपूर्वीच चेतेश्वर पुजाराला सौराष्ट्र संघाचा कर्णधार घोषित करण्यात आले आहे.
अश्विनला आणि जडेजाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे जर त्यांना ७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेसाठीही विश्रांती दिली तर ते रणजी सामन्यांच्या पहिल्या सामन्यात सामील होण्याची दाट शक्यता आहे.
त्याचबरोबर मुरली विजय दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होता. पण नंतर तो तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये सामील झाला होता त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीमधेही तो सामील झाला होता. त्यामुळे मुरली विजय आणि आर. अश्विन हे तामिळनाडू संघाच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
तसेच, भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला बडोदा संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. बडोदा संघात त्याच्या बरोबर युसूफ पठाणदेखील असणार आहे.
त्यामुळेच यावर्षीची रणजी स्पर्धेची पहिली फेरी या स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत रंगण्याची शक्यता आहे.
६ ऑक्टोबर ते २ जानेवारी असा रणजी ट्रॉफीचा कालावधी असणार आहे. ६ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरला पहिले सामने होतील तर २९ डिसेंबर ते २ जानेवारीला फायनल सामना रंगेल.