वॉर्नर पार्क स्टेडियम, सेंट किट्स येथे झालेला तिसरा टी२० सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला. या सामना विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. यानंतर उभय संघ मालिकेतील चौथा सामना खेळण्यासाठी शनिवारी (०६ ऑगस्ट) फ्लोरीडा येथे जमतील. परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळण्याच्या शक्यता फार कमी आहे.
तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे रोहित (Rohit Sharma Injury) केवळ ५ चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला होता. या सामन्यानंतर त्याने आपल्याला आता चांगले वाटत असल्याचे सांगितले आहे. मात्र तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही?, याबाबत अद्याप कसलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. अशात जर तो चौथ्या टी२० सामन्यासाठी अनुपलब्ध असल्यास भारतीय संघाचे नेतृत्त्व (Indian Team Captaincy) करण्यासाठी ३ खेळाडू दावेदार असू शकतात. त्याच खेळाडूंचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
१. हार्दिक पंड्या
या यादीत पहिले नाव येते अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचे. आयपीएल २०२२ मध्ये पहिल्यांदा गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व करताना त्याने संघाला विजेतेपद जिंकून दिले होते. आयपीएलमधील त्याच्या नेतृत्त्व कौशल्याने प्रभावित होऊन त्याला आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी प्रभारी कर्णधार नियुक्त करण्यात आले होते. या मालिकेत आयर्लंडला २-० ने पराभूत करत त्याने संघाला मालिकाही जिंकून दिली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेत हार्दिक भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे रोहित संघात नसताना त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.
२. रिषभ पंत
कर्णधार रोहित चौथ्या टी२० सामन्यातून बाहेर झाल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्त्व करू शकणाऱ्या खेळाडूंमध्ये यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याचेही नाव येते. रोहित आणि उपकर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पंतलाच भारतीय संघाची धुरा देण्यात आली होती. याखेरीज पंतला आयपीएलमध्येही फ्रँचायझीचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत चौथ्या टी२० सामन्यात पंतच्या खांद्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी येऊ शकते.
३. भुवनेश्वर कुमार
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हादेखील रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार बनण्याचा दावेदार आहे. भुवनेश्वरला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व करण्याचा जास्त अनुभव नाही. परंतु तो सध्या भारतीय संघातील सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेतही त्याला उपकर्णधार बनवण्यात आले होते. त्यामुळे भुवनेश्वरकडे चौथ्या टी२० सामन्यासाठी नेतृत्त्वपद दिले जाण्याचा विचार केला जाऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एशिया कप जिंकण्यासाठी कर्णधार रोहित लावणार जोर, असा असू शकतो तगडा भारतीय संघ
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार भारत, वेळापत्रक जाहीर
CWG 2022 | ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तान ४४ धावांनी पराभूत; स्पर्धेतूनही बाहेर