आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने नुकतेच बुधवारी (८ सप्टेंबर) आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या तसेच ‘नवा यॉर्कर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी नटराजनला संधी मिळेल, अशी अनेकांनी आशा व्यक्त केली होती. मात्र नटराजनला १५ सदस्यीय संघात तर नाहीच, पण राखीव खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले नाही.
या ३ खेळाडूमुळे नटराजनला भारतीय संघात स्थान मिळाले नाही
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी वेगवान गोलंदाजांनाच १५ जणांच्या संघात संधी दिली, तर शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर यांची राखीव खेळाडूंमध्ये निवड झाली. यामुळेच नटराजनची या स्पर्धेसाठी निवड झाली नाही.
नटराजनने आतापर्यंत केवळ ४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १७.४२ च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ७.६२ असा आहे. तसेच नटराजची ३० धावा देऊन ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी होती. जी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबरामध्ये ४ डिसेंबर २०२० साली केली होती.
तसेच, नटराजनने आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाने अनेक क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. नटराजनने आयपीएलमध्ये यॉर्कर गोलंदाजी करत अनेक फलंदाजांना अडचणीत आणले होते.
आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या २४ सामन्यांमध्ये नटराजनने ३४.४० च्या सरासरीने २० विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा इकॉनोमी रेट ८.२३ असा होता. आयपीएलमध्ये नटराजनची सर्वोत्तम कामगिरी ही २४ धावा देऊन २ विकेट्स अशी होती. सध्या नटराजन सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो याआधी २०१७ मध्ये तो पंजाब किंग्सकडून देखील खेळला होता.
बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंवर दाखवला विश्वास
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने आतापर्यंत ५० सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ५९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, मोहम्मद शमीने १२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ५१ सामन्यांमध्ये ५० विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे या अनुभवी गोलंदाजांची कामगिरी पाहता नटराजनला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळाले नाही.
टी नटराजनकडे कौशल्याची कसलीही कमतरता नाही. याची प्रचिती त्याने आयपीएलमध्ये दाखवून दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील त्याने गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. मात्र असे असले तरी, नटराजनकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळेच भारतीय संघाने नवख्या गोलंदाजाऐवजी अनुभवी गोलंदाजांवर विश्वास दाखवला.
आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,
राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंड-भारत संघातील पाचवा कसोटी तर रद्द, पण कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेवर झाला का परिणाम?
–मँचेस्टर कसोटी रद्द होताच क्रिकेटविश्वातून उमटल्या प्रतिक्रिया; कोणी दिला पाठिंबा, तर कोणाची टीका, पाहा ट्विट्स
–शुबमन गिलला सारा तेंडुलकरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण