सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा उत्तरार्ध खेळला जात आहे. या उत्तरार्धात आत्तापर्यंत युवा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय. यामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यावर एका संघाने विश्वास दाखवला नाही व करारमुक्त केले. सध्या असेच तीन खेळाडू आयपीएलमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहेत. आज त्याच खेळाडूंविषयी आपण जाणून घेणार आहोत.
१) हर्षल पटेल-
मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेला हरियाणाचा अष्टपैलू हर्षल पटेल सध्या आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजात अव्वलस्थानी आहे. त्याने आत्तापर्यंत ११ सामने खेळताना २६ बळी आपल्या नावे केले आहेत. आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला दिल्लीकडून ट्रेड करत आपल्या संघात सामील केलेले. दिल्लीसाठी हा सौदा तोट्याचा ठरला.
२) वरूण चक्रवर्ती-
सध्या कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणारा युवा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती हा २०१९ मध्ये ८ कोटींपेक्षा जास्त बोली घेऊन पंजाब संघाचा भाग बनला होता. मात्र, त्याला त्या हंगामात केवळ एक सामना खेळण्याची संधी दिली गेली व पुढील हंगामात त्याचा करार कायम ठेवला नाही. आयपीएल २०२० मध्ये त्याच्यावर केकेआरने विश्वास दाखवला. तेव्हापासून त्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात त्याने सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या फिरकीपटूमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
३) राहुल त्रिपाठी-
आयपीएल २०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर पुढील वर्षी पुणेकर राहुल त्रिपाठी राजस्थान रॉयल्स संघाचा भाग बनला. दोन हंगाम तो राजस्थान संघाचा भाग होता. मात्र, काही मोजक्या खेळ्या वगळता त्याला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याला राजस्थान संघाने कायम केले नाही. पुढे तो कोलकाता संघाचा भाग बनला व तो सातत्याने कोलकातासाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात राहुलने कोलकाताला दोन विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.