प्रत्येक भारतीय युवकाचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. मात्र, प्रत्येक युवा खेळाडूचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यांच्यातील काहींना भारतीय संघात खेळण्याची संधी मिळते. ज्यांना देशासाठी खेळण्याची संधी मिळते, त्यांच्यातील खूपच कमी खेळाडूंना संघाचे नेतृत्व करता येत. काहींना नेतृत्व करण्याची संधी मिळून देखील त्यांना ती पार पाडता येत नाही, ज्याचे सर्वोत्तम उदाहरण सचिन तेंडुलकर आहे. तर, दुसरीकडे काही खेळाडू असे असतात, ज्यांनी देशासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि जिंकवलेले असतात, पण ते त्यांच्या कारकीर्द संपेपर्यंत संघात एका खेळाडूच्याच भूमिकेत राहतात. त्यांना कधीच संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळत नाही.
भारतीय संघाचा इतिहास पाहिला तर, यामध्ये काही कर्णधारांची कारकीर्द खूपच अप्रतिम राहिली आहे. कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांची गणना आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये केली जाते. त्याव्यतिरिक्त राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांनीही चांगल्या प्रकारे संघाचे नेतृत्व पार पाडले, पण त्यांना जास्त काळासाठी ही जबाबदारी स्वीकारता आली नाही.
दुसरीकडे व्हीव्हीएस लक्ष्मण, झहीर खान यांच्यासारखे दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना पात्रता असतानाही संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. आपण या लेखात सध्याच्या भारतीय संघातील अशाच तीन खेळाडूंनी माहिती घेणार आहोत, जे संघातील अनुभवी खेळाडू आहेत, पण आता त्यांना कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळू शकणार नाही.
चेतेश्वर पुजारा
भारतीय संघासाठी नियमित कसोटी खेळणारा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा सध्या ३३ वर्षाचा आहे. त्याला त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकदाही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. पुजाराने आतापर्यंत ९० कसोटी आणि ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
कर्णधार विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले असले तरी, कसोटी आणि एकदिवसीय प्रकारामध्ये तो चांगले नेतृत्व करत आहे. तसेच कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे सध्या उपकर्णधार आहे आणि कर्णधारपदासाठी मोठा दावेदार आहे. अशात पुजाराला भविष्यात संघाचे नतृत्व करण्याची संधी मिळेल, याची शक्यता खूपच कमी आहे.
रविचंद्रन अश्विन
भारतीय संघाच्या या दिग्गज फिरकी गोलंदाजालाही आतापर्यंत एकदाही संघाचे नतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही. अश्विनने आतापर्यंतर ७९ कसोटी आणि १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. टी२० मध्ये त्याने भारतासाठी ४९ सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याला एकदाही कर्णधाराची जबाबदारी पार पडण्याची संधी मिळाली नाही आणि भविष्यतही त्याला ही संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याचे वय सध्या ३४ वर्ष आहे.
रविंद्र जडेजा
भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाही त्या खेळाडूंमध्ये सामील आहे, ज्यांना आजपर्यंत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. जडेजा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी२०) भारतीय संघाचे नियमित प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत ५६ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच १६८ एकदिवसीय आणि ५५ टी२० सामन्यांमध्येही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. जडेजा सध्या ३२ वर्षाचा आहे आणि त्याला कर्णधार करण्यापूर्वी भारतीय संघात इतर अनेक दिग्गज खेळाडू आहे, जे या पदासाठी प्रबळ दावेदार आहेत. आता चाहते जडेजाला कर्णधाराच्या रूपात पाहतील, याची खूपच कमी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझमने केले मान्य, उपांत्य सामन्यात ‘या’ गोष्टी संघासाठी पडल्या महागात
आझमचा विराटच्या आणखी एका विश्वविक्रमाला धक्का! ‘या’ यादीत मिळवला अव्वल क्रमांक