यावर्षी भारतीय संघाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यात अनेकांनी या संधीचे सोनेही केले. यात मुंबईकर श्रेयश अय्यर, शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे.
या ५ खेळाडूंनी केले भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण
५. वॉशिंग्टन सुंदर: भारतीय संघात वॉशिंग्टन सुदंरची श्रीलंका विरुद्ध पार पडलेल्या टी २० मालिकेसाठी निवड झाली होती. पण त्या आधीच श्रीलंका विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झालेला केदार जाधव दुखापतीतून सावरला नसल्याने वॉशिंग्टनची बदली खेळाडू म्हणून निवड झाली आणि त्याला वनडे संघातून आंतराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली.
वॉशिंग्टनने १३ डिसेंबरला श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात आंतराष्ट्रीय पदार्पण केले. यात त्याने १ बळी घेतला होता. यानंतर त्याने २४ डिसेंबरला श्रीलंका विरुद्धच तिसऱ्या टी २० सामन्यात आंतराष्ट्रीय टी २० मध्येही पदार्पण केले. या सामन्यातही त्याने १ बळी घेतला होता.
४. शार्दूल ठाकूर: भारताच्या श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेसाठी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली होती. त्याने ३१ ऑगस्टला कोलंबोमध्ये चौथ्या वनडे सामन्यात आंतराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात त्याने २६ धावात एक बळी घेतला होता.
शार्दुलला या मालिकेच्या पाचव्या वनडेतही संधी देण्यात आली होती परंतु त्याला या सामन्यात एकही बळी घेता आला नाही.
३. श्रेयश अय्यर: मुंबईकर श्रेयश अय्यरला यावर्षी भारतीय वनडे आणि टी २० संघातही संधी मिळाली. श्रेयसने १ नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी २० सामन्यातून आंतराष्ट्रीय पदार्पण केले. पण त्याला या सामन्यात फलंदाजी मिळालीच नाही. त्यानंतर त्याला श्रीलंका विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतही सर्व सामन्यात संधी देण्यात आली.
श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच धरमशाला येथे पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातून वनडे पदार्पण केले. या सामन्यात त्याला संधीचे सोने करता आले नाही मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली.
२. हार्दिक पंड्या: भारतीय संघातील अष्टपैलू म्हणून नावारूपाला आलेल्या हार्दिक पंड्याने यावर्षी कसोटीत पदार्पण केले. त्याला श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली होती. त्याने २६ ते २९ जुलै दरम्यान झालेल्या पहिल्याच कसोटीत पहिल्या डावात अर्धशतक केले होते तसेच या सामन्यात त्याला एकच बळी मिळाला होता.
हार्दिकने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० सामन्यातून मागीलवर्षी पदार्पण केले होते.
१. कुलदीप यादव: हे वर्ष कुलदीपसाठी खास ठरले त्याचे यावर्षात भारताकडून तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. त्याने सर्वप्रथम आंतराष्ट्रीय पदार्पण विंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २३ जूनला पहिल्या वनडे सामन्यातून केले. पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना थांबवण्यात आला. नंतर कुलदीप भारताकडून टी २० आणि कसोटी सामन्यातही खेळला.