बॉलिवूडमध्ये एखाद्या खेळाडूच्या जीवनावरील चित्रपटांचे सध्या ट्रेंड चालू आहेत. विशेषतः जर हा चित्रपट एखाद्या क्रिकेटपटूवर होणार असेल तर ते मग सोन्याहून पिवळं असेल. आतापर्यंत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर देखील चित्रपट बनले आहेत आणि हे चित्रपट खूप गाजलेही आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये अजून काही क्रिकेटपटूंच्या जीवनावर चित्रपट प्रकाशित होण्याची तयारी सुरु आहे, ज्यामध्ये कपिल देव, मिताली राज यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये आता भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुली याचेही नाव जोडले जाणार आहे. त्याच्या जीवनावर देखील चित्रपट होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. परंतु त्याला स्वत: गांगुलीने यासाठी हिरवा झेंडा दाखवल्याची चर्चा आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, क्रिकेटपटू सौरव गांगुलीने स्वत:च्या जीवनावर चित्रपट बनवण्यासाठी होकार दिला आहे. हा चित्रपट व्हायकॉमच्या बॅनरखाली बनणार आहे. मात्र यात सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार? याची माहिती अधिकृतपणे अजूनही मिळाली नाही.
पण मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता रणबीर कपूर यात सौरव गांगुलीची भूमिका साकारताना दिसून येऊ शकतो. यापूर्वी एका मुलाखतीत गांगुलीने म्हटले होते की, हृतिक रोशन हा त्याचा आवडता अभिनेता आहे. परंतु त्यानंतर हृतिक गांगुलीचे पात्र साकारू शकेल की नाही यांत शंकाच आहेत.
यासंदर्भात सौरव गांगुलीने एका चॅनेलला माहिती देताना सांगितले की, “हो, बायोपिकसाठी मी परवानगी दिली आहे. हा चित्रपट हिंदीमध्ये तयार होणार आहे. परंतु अजूनही या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव सांगणे शक्य नाही. सर्वकाही व्यवस्थित करण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत.” परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील लिहायला सुरु केली आहे.
प्रॉडक्शन हाऊसच्या सौरव गांगुलीशी बर्याच भेटी झालेल्या आहेत. गांगुलीच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार असल्याचा अंतिम निर्णय झाला आहे. पण गांगुलीची भूमिका कोण करणार? यावर अजून बोलणे सुरूच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचे नाव जवळजवळ अंतिम होण्याच्या मार्गावर आहे. गांगुलीच्या भूमिकेत रणबीर कपूर ‘हॉट चॉईस’ आहे. गांगुलीने स्वतः रणबीरचे नाव सुचवले आहे. परंतु अभिनेत्याच्या यादीत आणखी दोन कलाकारांची नावे आहेत.
अलीकडच्या काळात बॉलिवूडमध्ये खेळ आणि क्रीडापटूंच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड वेगात सुरू झाला आहे. एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, मिल्खा सिंग, मेरी कोम आणि संदीप सिंग यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच 1983 विश्व चषक जिंकणार्या भारतीय संघावर आणि सायना नेहवाल यांच्यावर चित्रपट बनला आहे. त्यामुळे सौरव गांगुलीच्या कारकीर्दीवर बनलेला चित्रपटही प्रेक्षकांना भुरळ घालू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा वेश बदलून अभिनेता आमिर खान गेला होता दादाच्या घरी, सेक्युरिटी गार्डने केलतं बाहेर
बापरे! ‘दादा’चे तब्बल ३६ कोटी रुपये देत नाहीयेत ‘या’ दोन कंपन्या; कोर्टात घेतली धाव
स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई, सामना जिंकणंही अवघड! ‘द हंड्रेड लीग’चे नवे नियम वाचलेत का?