भारतीय संघ येत्या १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. यासाठी भारतीय संघाने खेळाडूंची घोषणा केली आहे. तसेच भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा होऊ शकते.
या संघामध्ये बीसीसीआय युवा खेळाडू आणि गेल्या काही वर्षांपासून संघात संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या खेळाडूंची निवड करु शकते. यामध्ये असा एक खेळाडू आहे, ज्याने भारतीय संघासाठी शेवटचा वनडे सामना ८ वर्षांपूर्वी खेळला होता. तो देखील या मालिकेत पुनरागमन करू शकतो.
श्रीलंका दौरा सुरू असताना भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सराव करताना दिसून येईल. त्यामुळे बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यावर दुसरा संघ पाठवणार आहे. या संघात आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेले खेळाडू, युवा खेळाडू तसेच गेल्या काही वर्षांपासून संघात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात येऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्स संघाचा डावखुरा गोलंदाज जयदेव उनादकटला देखील संघात संधी देण्यात येऊ शकते. त्याने शेवटचा वनडे सामना ८ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा टी-२० सामना त्याने २०१८ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध खेळला होता. जर त्याला वनडे संघात स्थान मिळाले तर तो ८ वर्षानंतर वनडे संघात पुनरागमन करेल.
जयदेव उनाडकटची कारकीर्द
जयदेव उनाडकट डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तसेच त्याच्या गोलंदाजीमध्ये तो मिश्रण देखील करतो. त्याला भारतीय संघासाठी तिनही प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. परंतु त्याला आपले स्थान टिकवून ठेवण्यात अपयश आले. त्याने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेल्या या सामन्यात त्याला २ बाद करण्यात यश आले होते. तसेच त्याने आतपर्यंत ७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याला ८ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच १० टी -२० सामन्यांमध्ये त्याला एकूण १४ गडी बाद करण्यात यश आले आहे.
भारतीय संघाचा बी संघ देखील आहे मजबूत
भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवण्यात येणार आहे. या संघातही अशा खेळाडूंचे पर्याय उपलब्ध आहेत, जे संघाला एकहाती सामना जिंकून देऊ शकतात. तसेच येत्या काही महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंकडे ही एक उत्कृष्ट संधी आहे. या दौऱ्यात चांगली कामगिरी केली तर त्यांना टी-२० विश्वचषक स्पर्धेचे तिकीट मिळू शकते.
असा असेल श्रीलंका दौरा
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना -१३ जुलै
२)दुसरा वनडे सामना-१६ जुलै
३)तिसरा वनडे सामना -१९ जुलै
टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना -२२ जुलै
२) दुसरा टी -२० सामना -२४ जुलै
३) तिसरा टी -२० सामना -२७ जुलै
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी चॅम्पियनशीपमध्ये अशी राहिली आहे कोहली आणि विलियम्सनची कामगिरी, पाहा कोण राहिलं आहे श्रेष्ठ
“रिषभ पंत भविष्यातील कर्णधार आहे, यात कोणतीही शंका नाही”, भारताच्या महान क्रिकेटपटूचे मोठे भाष्य