भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. संघ सातत्याने विविध देशांविरुद्ध कधी मायदेशात तर कधी विदेशात खेळताना दिसतोय. आता वरिष्ठ संघासोबत भारताच्या द्वितीय श्रेणीच्या संघाला देखील आपले कसब दाखवण्याची संधी मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच न्यूझीलंड ए संघ भारत दौऱ्यावर येईल. आता त्या मालिकांसाठी आणखी एका युवा खेळाडूच्या हाती इंडिया ए संघाचे कर्णधारपद देण्यात येईल.
सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड अ संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात १ ते २७ सप्टेंबर दरम्यान ३ चारदिवसीय प्रथमश्रेणी व तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. हे सामने भारतातील बेंगलोर आणि चेन्नई शहरात होतील. या सामन्यांसाठी इंडिया ए संघाचे नेतृत्व गुजरातचा अनुभवी सलामीवीर प्रियांक पांचाल याच्याकडे सोपवले जाऊ शकते.
प्रियांक पांचाल हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करतो. यापूर्वी देखील त्याला इंडिया ए संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मागील वर्ष दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने ही जबाबदारी पार पाडलेली. ३२ वर्षीय पांचाल त्याच्या प्रथमश्रेणी क्रिकेटमधील अनुभवामुळे या पदासाठी सर्वात मोठा दावेदार मानला जातोय. त्याचसोबत भारतीय कसोटी संघाचा भाग असलेला हनुमा विहारी हा देखील नेतृत्वासाठी त्याला आव्हान देईल. याव्यतिरिक्त सध्या वनडे क्रिकेटमध्ये तुफान फॉर्ममध्ये असलेला युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यादेखील नावाचा विचार होऊ शकतो.
न्यूझीलंड ए संघ सात वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या दौऱ्यावर येतोय. त्यांनी यापूर्वीच आपल्या संघाची घोषणा केली असून, या संघात सात आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी न्यूझीलंड ए ने दोन कर्णधारांची नावे घोषित केली आहेत. अनुभवी अष्टपैलू टॉम ब्रूस व रॉबी ओडोनील संघाचे नेतृत्व करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील
‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला