इंडियन प्रीमिअर लीग 2024 लिलाव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 19 डिसेंबर रोजी दुबईत लिलाव पार पडणार आहे. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने कर्णधारपदावरून हटवल्यामुळे रोहित शर्मा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या जागी हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मात्र, अशी बातमी आहे की, दिल्ली कॅपिटल्सने आधी रोहितला संघाचा भाग बनवण्यात रुची दाखवली होती. दिल्लीने रोहितला ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला होता, पण मुंबईने हा प्रस्ताव नाकारला.
असे सांगितले जात आहे की, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रँचायझीची इच्छा होता की, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेत संघाचे नेतृत्व करावे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाने आपल्या यशस्वी कर्णधाराला सोडण्यास नकार दिला. रोहितने मुंबईला 5 आयपीएल किताब जिंकून दिले आहेत. त्याने 2013 हंगामात नेतृत्व हातात घेताच पहिला किताब जिंकून दिला होता. त्यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 हंगामातही किताब जिंकून दिला होता.
दिल्ली कॅपिटल्सने आता आयपीएल 17 हंगामासाठी रिषभ पंत याला आपला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. खरं तर, रिषभ मागील वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, तो आता वेगाने बरा होत असून फलंदाजीचा सरावही करत आहे. तो आयपीएलमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतानाही दिसू शकतो.
डेविड वॉर्नरने 2023 आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते. मात्र, संघाला खास प्रदर्शन करता आले नव्हते. त्यामुळे कदाचित दिल्ली संघ व्यवस्थापनाला रोहितसारख्या नेतृत्वाची गरज भासली असेल, ज्याच्याकडे आयपीएलसारख्या स्पर्धा जिंकण्याचा प्रचंड अनुभव आणि क्षमता आहे.
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समधील डील झाली नाही. अशात रोहित 2013नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स संघासाठी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये एक खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. रोहितने त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स संघासोबत केली होती. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा वारसा पुढील पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील, यात कोणतीही शंका नाही. (this team approached mumbai indians to trade rohit sharma IPL 2024)
हेही वाचा-
भारतीय संघाला मोठा धक्का! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्टार खेळाडू बाहेर, ‘या’ खेळाडूची वर्णी
लायन…नाम तो सुना होगा! पाकिस्तानविरुद्ध घडवला इतिहास, बनला कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जगातला 8वा बॉलर