कसोटी क्रिकेट हे क्रिकेटमधील सर्वात अवघड प्रारूप मानले जाते. जो खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करतो त्याला क्रिकेट वर्तुळात एका वेगळ्याच दृष्टीकोनातून बघितले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना धावा बनवण्यासाठी धैर्य आणि चिकाटीची आवश्यकता असते. सलग पाच दिवस खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात अनेक फलंदाजांना धावा करण्यात अपयश येते, मात्र काही फलंदाज आपल्या संयमी फलंदाजीने धावा जमवण्यात यशस्वी ठरतात. आपण या लेखात टॉप 3 भारतीय खेळाडू बघणार आहोत ज्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
3) मयंक अगरवाल (19 डाव) –
स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा केल्यानंतर मयंक अगरवालला 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत मयंकने उत्तम फलंदाजी करत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले. भारतासाठी सलामीला खेळणाऱ्या कर्नाटकच्या या युवा खेळाडूने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत केवळ 19 डावात 1000 कसोटी धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सर्वाधिक जलद 1000 कसोटी धावा करणाऱ्या यादीत मयंक हा तिसऱ्या स्थानी आहे.
2) चेतेश्वर पुजारा (18 डाव)
दिग्गज फलंदाज राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजारा हा भारतीय संघासाठी नवीन भिंत म्हणून ओळखला जातो. राहुल द्रविड यांच्याप्रमाणेच नंबर 3 वर खेळत असताना पुजाराने संघासाठी उत्तम कामगिरी केलेली आहे. आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणे हा पुजाराचा सर्वाधिक महत्त्वाचा गुण आहे. भारताच्या या न्यू वॉलने केवळ 18 डावांत एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. भविष्यातही पुजाराकडून भारतीय संघाला अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
1) विनोद कांबळी (14 डाव) –
विनोद कांबळी हा आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जात असे, मात्र कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तितकीशी यशस्वी ठरली नाही. कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात अतिशय उत्तम केली होती. भारतासाठी कसोटीत सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम अजूनही विनोद कांबळीच्याच नावावर आहे. कांबळीने केवळ 14 डावात एक हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. अनेक वाद व आपल्या वर्तनामुळे कांबळीला आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द यशस्वी करता आली नाही. मात्र आपल्या या रेकॉर्ड मुळे तो नेहमीच क्रिकेट रसिकांच्या स्मरणात राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: तूला मानलं पाहिजे भावा! ‘या’ ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने अवघ्या १५ चेंडूत ठोकले अर्धशतक
बीसीसीआयने तातडीने द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवावे, ‘या’ भारतीय दिग्गजाचा सल्ला
जडेजाचा हलगर्जीपणा बेतला असता रोहित आणि रहाणेच्या जीवावर; ‘हिटमॅन’चा धक्कादायक खुलासा