यावर्षी यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक पार पडला. १४ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा शेवटचा सामना खेळला गेला. न्यूझीलंडला धूळ चारत ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा विश्वविजेता संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात न्यूझीलंडला ८ विकेट्स राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलिया संघासाठी त्यांनी जिंकलेला हा पहिलाच टी-२० विश्वचषक ठरला आहे.
यावर्षी टी-२० विश्वचषकात अनेक खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले, यामध्ये अनेक युवा खेळाडूंचा समावेश होता. युवा खेळाडूंनी या विश्वचषकात त्यांची छाप सोडली. तर दुसरीकडे असेही काही खेळाडू होते, जे संपूर्ण विश्वचषकादरम्यान काही खास कमाल करू शकले नाहीत. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव होता. असे असले तरी, ते यावर्षी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी त्यांच्या टी-२० विश्वचषकातील खराब प्रदर्शनामुळे चाहत्यांची निराशा केली.
तीन दिग्गज खेळाडू, जे टी-२० विश्वचषकात अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत
३. कायरन पोलार्ड
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड, हे एक मोठे नाव आहे. पोलार्ड जगभरातील वेगवेगळ्या लीग स्पर्धांमध्ये खेळला आणि स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. मात्र, टी-२० विश्वचषकात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. कायरन पोलार्ड आणि संपूर्ण वेस्ट इंडीज संघ यांच्याकडून चाहत्यांना टी-२० विश्वचषकात खूप अपेक्षा होत्या, पण या अपेक्षा धुळीस मिळाल्या. वेस्ट इंडीज संघाच्या प्रदर्शनासोबतच पोलार्डचेही प्रदर्शन खूपच खराब होते.
पोलार्डने या विश्वचषकात खूपच खराब प्रदर्शन केले आहे. त्याने विश्वचषकात खेळलेल्या ५ सामन्यात २२.५० च्या सरासरीने फक्त ९० धावा केल्या आहेत. त्याच्या या खराब प्रदर्शनाचा परिणाम वेस्ट इंडीज संघावर देखील पडला आहे.
२. क्विंटन डी कॉक
दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक जगभरात त्याच्या उत्तम खेळीसाठी ओळखला जातो. डी कॉक उंचीने लहान असला तरी, जेव्हा फलंदाजी करताना तो फॉर्ममध्ये असतो, तेव्हा मोठे मोठे शॉट सहज खेळतो. टी-२० क्रिकेटमध्ये डी कॉक अधिकच आक्रमक रूप धारण करतो. त्याला टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक खतरनाक फलंदाजांमध्ये गणले जाते.
यावर्षी टी-२० विश्वचषकात चाहत्यांना डी कॉककडून खूप अपेक्षा होत्या, पण तो या अपेक्षांना पात्र ठरू शकला नाही. दक्षिण अफ्रिकेने स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले. पण डी कॉकने मात्र सर्वांचीच निराशा केली आहे. त्याने या विश्वचषकात खेळलेल्या ४ डावांमध्ये १७.२५ च्या सरासरी आणि १०७.८१ च्या स्ट्राइक रेटने अवघ्या ६९ धावा केल्या.
१. ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० विश्वचषकात आश्चर्यंकारक प्रदर्शन केले आणि स्पर्धेचे जेतेपद पटकावले. टी-२० विश्वचषकात यावर्षी अनेकांच्या नजरा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलवर होत्या, पण तो काही खास कामगिरी करू शकला नाही. मॅक्सवेलने यूएईतील खेळपट्टीवर विश्वचषकापूर्वी आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले होते, पण तो ही कामगिरी कायम ठेवू शकला नाही.
त्याचे टी-२० विश्वचषकातील प्रदर्शन खूपच साधारण होते. त्याने संपूर्ण विश्वचषकात ७ सामन्यांमध्ये १८ ची सरासरी आणि १०० च्या स्ट्राइक रेटने ६४ धावा केल्या आहेत. चाहत्यांना मॅक्सवेलकडून यापेक्षा खूप जास्त अपेक्षा होत्या, ज्यात तो प्रत्यक्षात उतरवू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
देवा, असाच खेळत राहा! चालू सामन्यात प्रेक्षकाची मैदानावर धाव, थेट रोहितपुढे घातला दंडवत-Photo
विराटचा राजीनामा आणि एबीची निवृत्ती; आरसीबीपुढे उभा राहिला नेतृत्वाचा प्रश्न; हे आहेत दावेदार