आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता खेळाडूंच्या फीटनेसवर अधिक लक्ष दिले जात आहे. हेच आता मैदानावरही दिसत आहे. फीटनेसचा दर्जा जितका चांगला असेल तितकीच चांगली खेळाडूंची कारकीर्द असू शकते. आता भारतीय क्रिकेटही त्याच दिशेने पुढे जात आहे.
भारतीय संघाबद्दल बोलायचं म्हटलं तर कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) फीटनेसच्या बाबतीत अव्वल मानले जाते. सध्या भारतीय संघाच्या फीटनेसमध्ये जी काही सुधारणा होत आहे ती विराटमुळे होत आहे. परंतु तरीही भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी फीटनेसच्या बाबतीत विराटलाही मागे टाकले आहे.
भारतीय संघात असे ३ खेळाडू आहेत. ज्यांनी यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) दरम्यान विराटलाही मागे टाकले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नावाचा समावेश नाही. तर काही असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांचे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
मनीष पांडे-
भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे (Manish Pandey) फीटनेसच्या बाबतीत चांगला खेळाडू समजला जातो. तो भारताच्या इतर क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. विराटला पांडेने यो-यो टेस्टदरम्यान पराभूत केले होते. तसेच फीटनेस ट्रेनरही पांडेची प्रशंसा करतात.
पांडे सध्याच्या काळात भारतीय संघाचा भाग बनला आहे. त्याने फलंदाजीनेही चांगली कामगिरी केली आहे. विराटने यो-यो टेस्ट दरम्यान १९ गुण मिळविले होते. परंतु पांडेने या टेस्ट दरम्यान १९.२ गुण मिळविले होते. त्यामुळे तो फीटनेसच्या बाबतीत विराटच्या पुढे आहे.
पांडे जेव्हा खेळपट्टीवर धाव घेण्यासाठी पळतो तेव्हा तिथेही त्याची फीटनेस पहायला मिळतो. जडेजाबरोबरच पांडेच्या नावाचाही भारतीय संघाच्या चांगल्या क्षेत्ररक्षकांमध्ये समावेश होतो. सध्या तो आयपीएलची वाट पाहत आहे.
करूण नायर-
कसोटी क्रिकेट प्रकारात भारताच्या दोनच खेळाडूंनी त्रिशतकी खेळी केली आहे. यामध्ये पहिल्यांदा विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आणि दुसऱ्यांदा करूण नायरने (Karun Nair) अशी कामगिरी केली आहे. फीटनेसच्या बाबतीत नायरलाही चांगले म्हटले जाते. सध्या तो कर्नाटक संघाकडून खेळताना दिसतो.
त्रिशतकानंतर नायरने आपला फॉर्म न सांभाळल्यामुळे तो भारतीय संघात अधिक काळ टिकला नाही. परंतु त्याच्या पुनरागमनाची आशा सर्वांनाच आहे. भारतीय संघाचा माजी फीटनेस ट्रेनर शंकर बासूने नायरला भारताच्या सर्वात फीट खेळाडूंच्या यादीत सामील असल्याचे सांगितले होते.
नायर धाव घेण्यासाठी खेळपट्टीवर जेव्हा धावतो तेव्हा त्याची फीटनेस पहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक म्हणून नायर खूप चांगला आहे. आयपीएलमध्ये नायर किंग्स इलेव्हन पंजाबचा भाग आहे. त्यालाही आता याच स्पर्धेची उत्सुकता आहे.
मयंक डागर-
१९ वर्षाखालील भारतीय संघासाठी खेळणाऱ्या मयंक डागरचाही (Mayank Dagar) या यादीत समावेश आहे. २०१६मध्ये मयंक इशान किशन आणि रिषभ पंतबरोबर भारताच्या १९ वर्षाखालील संघासाठी खेळला होता. यावेळी चांगली कामगिरी करत त्याने एकूण ११ विकेट्स आपल्या नावावर केले होते.
आयपीएल २०१८ दरम्यान मयंक किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाचा भाग होता. तो डावखुरा फिरकीपटू आहे. मयंकने यो-यो टेस्टदरम्यान फक्त विराटच नाही तर पांडेलाही मागे टाकले होते. मयंकने यावेळी १९.३ गुण मिळवले होते.
मयंक आता हिमाचल प्रदेश संघासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यामध्ये चांगली कामगिरी करून तो लवकरच भारतीय संघात आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये करार करण्याचाही प्रयत्न करेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
-जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर
-राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा