वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावा उभारल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी डेरिल मिचेल, रचिन रवींद्र व जिमी निशाम यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, त्यांना 5 धावांनी पराभूत व्हावे लागले. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात सामन्यातील अखेरचे षटक अत्यंत रोमांचक पाहायला मिळाले.
https://www.instagram.com/p/Cy8a_V6s9lk/?igshid=MzRlODBiNWFlZA==
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 389 धावांचे आव्हान दिल्यानंतर रचिन रवींद्र व डेरिल मिचेल यांनी उत्कृष्ट भागीदारी करत आपल्या संघाला सामन्यात कायम ठेवले. हे दोघे बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या सर्व अपेक्षा अष्टपैलू जिमी निशाम याच्यावर अवलंबून होत्या. त्याने चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. अखेरच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 19 धावांची गरज होती.
मिचेल स्टार्क टाकत असलेल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर बोल्टने एक धाव घेत निशाम याला स्ट्राइक दिली. त्यानंतर स्टार्क याने टाकलेला वाईड चेंडू यष्टीरक्षक इंग्लिस अडवू शकला नाही व न्यूझीलंड संघाला पाच धावा मिळाल्या. त्यामुळे न्यूझीलंडसाठी 5 चेंडूवर 13 धावा असे समीकरण तयार झाले. पुढील चेंडूवर दोन धावा निघाल्याने चार चेंडूत 11 धावा असे सोपे समीकरण न्यूझीलंडच्या बाजूने होते.
त्याच्या पुढील चेंडूवर निशाम याने जोरदार खेळलेला फटका मॅक्सवेल याने अडवत दोन महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. चौथ्या चेंडूवर देखील लॅब्युशेन याने सीमारेषेवर अशाच प्रकारे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत, दोन महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या. अखेरच्या दोन चेंडूंवर सात धावांची गरज असताना निशाम फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्यात अपयशी ठरला. याचवेळी तो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. अखेरचा चेंडूवर फर्ग्युसन हा एकही धाव काढण्यात अपयशी ठरल्याने ऑस्ट्रेलियाने पाच धावांनी विजय मिळवला.
(Thrilling Final Over In Australia v Newzealand Match Neesham Runout Turned Things)
महत्वाच्या बातम्या –
रचिनचा रंग कायम! ऑस्ट्रेलियन गोलंदाजी फोडत ठोकले दुसरे वर्ल्डकप शतक
ऑस्ट्रेलियाने मागील तीन सामन्यात बॉल पाठवलाय ढगात, ठोकले तब्बल इतके षटकार