मुंबई । भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे अब्जावधी लोक दिवाने आहेत. आपल्या कारकीर्दीत विक्रमांचाही विक्रम रचणाऱ्या या खेळाडूमध्ये धावांची प्रचंड भूक होती. प्रत्येक सामन्यात अचाट खेळी करून जायचे. विरोधकांना आणि टीकाकारांना नेहमीच आपल्या ‘बॅट’ने उत्तर दिले. आपल्या खेळीने साऱ्यांनाच थक्क करून सोडणारे सचिन यांनी भारताकडून खेळताना सचिन 200 कसोटी आणि 463 एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 15 हजार 921, 18 हजार 426 धावा केल्या.
सचिन यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके तर कसोटी 51 क्रिकेटमध्ये शतके ठोकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. शतकांचे शतक हा विक्रम जणू हिमालयाहून मोठी गोष्ट. असा विक्रम करणारे ते पहिले व एकमेव खेळाडू. त्यावेळी त्यांचे शंभरावे शतक जगभर एक चर्चेचा विषय झाला होता. या शंभराव्या शतकावेळी घडलेल्या घटनेचा धक्कादायक खुलासा इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दितले शंभरावे शतक ठोकून इतिहास रचण्याच्या मार्गावर होते. वेगवान गोलंदाज टीम ब्रेसनन याने सचिनला 90 धावांवर बाद केले. त्यामुळे सचिनच्या आवाक्यात आलेला विक्रम अगदी थोडक्यात हुकला. हा विक्रम करण्यासाठी पुन्हा काही दिवसांची वाट पाहावी लागली.
यॉर्कशायर क्रिकेट: कवर ऑफ पॉडकास्ट वर या घटनेची आठवण करून देत ब्रेसनन म्हणाला की, “सचिनला शंभरावे शतक पूर्ण करून न दिल्याने त्याला आणि पंच रॉड टक्कर यांना कुणीतरी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वास्तविक पाहता, चेंडू लेग स्टम्प मिस करत होता आणि पंचांनी त्यांना बाद दिले. या सामन्यात सचिन शतक पूर्ण करू शकले असते. पण पंचांनी त्यावेळी त्यांना बाद दिले. त्यावेळी बीसीसीआयने डीआरएस सिस्टिम वापरण्यास विरोध करत होती. आम्ही ही मालिका जिंकलो आणि क्रमांक एकचा संघ बनलो. ट्विटरवर बरेच दिवस जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. त्यानंतर आम्हा दोघांना पोलिसांच्या सुरक्षेचा आधार घ्यावा लागला.”
आशिया चषक स्पर्धेत स्वप्न झाले पूर्ण
सचिन तेंडुलकर यांनी 2012 साली बांगलादेशविरुद्ध आशिया चषक स्पर्धेत खेळताना ऐतिहासिक शतक पूर्ण केले. आणि विक्रमाला गवसणी घातली. शतकांचे शतक पूर्ण करणारे पहिले खेळाडू ठरले. परंतु हा सामना मात्र भारत पराभूत झाला होता.