मुंबई इंडियन्सचा फलंदाज टिम डेव्हिड आणि संघाचा फलंदाजी कोच कायरन पोलार्ड यांच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दोघांनी स्तर 1 चा अपराध केला, ज्यामुळे त्यांना मॅच फीचा 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. टिम डेव्हिड आणि कायरन पोलार्ड यांनी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात एक मोठी चूक केली होती. मात्र निवेदनात या चुकीचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
आयपीएलनं शनिवारी (20 एप्रिल) जारी केलेल्या निवेदनुसार, टिम डेव्हिड आणि कायरन पोलार्डला पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. या दोघांनी 18 एप्रिल रोजी मुल्लानपूर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात आयपीएल आचार संहितेच्या कलम 2.20 अनुसार स्तर 1 चा अपराध केला असून त्यांनी आपली चुकी मान्य केली आहे. आचार संहितेच्या स्तर 1 च्या उल्लंघनासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
बोललं जातंय की, डेव्हिड आणि पोलार्डवर ही कारवाई यासाठी केली गेली की, त्यांनी डगआऊटमधून रिव्ह्यू घेण्यासाठी इशारा केला होता. ही घटना अर्शदीप सिंगच्या 15व्या षटकात घडली. त्यावेळी सूर्यकुमार यादव 67 वर फलंदाजी करत होता. डेव्हिड आणि पोलार्ड रिव्ह्यू घेण्यासाठी इशारा करत असल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी यावरून त्यांच्यावर टीकाही केली आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्जवर 9 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मुंबईनं सूर्यकुमार यादवच्या 78 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 192/7 असा दमदार स्कोर उभा केला. टिम डेव्हिडच्या बॅटमधून 14 धावा निघाल्या. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्ज 5 चेंडू बाकी असताना 183 धावांवर ऑलआऊट झाली. पंजाबकडून आशुतोष शर्मा यानं 61 आणि शशांक सिंहनं 41 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि जेराल्ड कोएत्झे यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल-डी कॉकनं मोडला स्वतःचाच विक्रम, भागीदारीच्या बाबतीत वॉर्नर-धवनला टाकलं मागे
IPL 2024 मध्ये ‘थाला’ अजूनही नाबादच! 255 च्या स्ट्राईक रेटनं करतोय गोलंदाजांची धुलाई
लखनऊचा चेन्नईवर 8 गडी राखून सहज विजय, राहुल-डी कॉकच्या फटकेबाजीसमोर सीएसकेचे गोलंदाज पूर्णपणे फेल