साउथम्पटन येथे सुरू असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पाचव्या दिवशी (२२ जून) अनेक विक्रम रचले गेले. त्यावेळी एक असा विक्रम रचला गेला, ज्याची कल्पना देखील कोणत्याही क्रिकेट चाहत्याने केली नव्हती. टिम साऊदी याने रचलेल्या विक्रमाची चर्चा चांगलीच रंगली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ३० धावांची छोटेखानी खेळी करताना साऊदीने कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरसारख्या विक्रमादित्य फलंदाजाला न जमलेल्या विक्रमाला गवसणी घातली. साऊदीने केलेली ही कामगिरी इयान बोथम, कपिल देव तसेच सध्याच्या रोहित शर्मा यांना देखील करता आली नाही.
काय आहे विक्रम
न्यूझीलंडच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या वेगवान गोलंदाज टिम साऊदीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावामध्ये न्यूझीलंडसाठी ४६ चेंडूमध्ये १ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केली. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने एक उत्तुंग षटकार लगावत एका खास यादीत आपली नोंद केली ज्यामध्ये अनेक दिग्गज फलंदाजांचा समावेश नाही.
साऊदीने आपल्या ७९ कसोटींच्या कारकिर्दीत ७५ षटकार मारले आहेत. त्याने या डावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फलंदाज रिकी पॉंटिंग याच्या ७३ षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले.
हे दिग्गज आहेत साऊदीच्या पाठीमागे
फलंदाजीतील अनेक विक्रम नावे असणाऱ्या भारताच्या सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० सामने खेळताना केवळ ६९ षटकार लगावले होते. आपल्या कारकीर्दीदरम्यान आक्रमण फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या इयान बोथम यांना १०२ कसोटीत ६७ तर, कपिल देव यांनी १३१ कसोटीत केवळ ६१ षटकार मारता आले होते.
हे दिग्गज साऊदीच्या निशाण्यावर
आतापर्यंत ७५ षटकार मारणाऱ्या साऊदीच्या निशाण्यावर यानंतर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (७८ षटकार), इंग्लंडचा केविन पीटरसन (८१ षटकार) व वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा (८८ षटकार) यांचे विक्रम असतील. आंतराष्ट्रीय कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत १०७ षटकार ठोकले होते. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट (१०० षटकार) व वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (९९ षटकार) यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Final, INDvNZ: आयसीसीने जाहीर केले राखीव दिवसाचे नवे नियम, जाणून घ्या सविस्तर
विशेष कट रचून न्यूझीलंडचा केला गेम, टीम इंडियाचा हुकमी एक्का शमीचा खुलासा