टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) पुरुष हॉकीमधील उपांत्य सामना बेल्जियम आणि भारत संघात पार पडला. या सामन्यात भारताला बेल्जियमने २-५ ने पराभूत केले. भारतीय संघाच्या पराभवामुळे चाहत्यांसोबतत कुटुंबीय देखील निराश झाले आहेत. खरं तर या विजयानंतर भारत ४१ वर्षांनंतर पहिल्यांदा अंतिम सामन्यात पोहोचून ऑलिंपिक पदक जिंकला असता. मात्र, तसे झाले नाही. या पराभवानंतर भारतीय संघाचा हॉकीपटू गुर्जंत सिंगच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
अमृतसरच्या जंडियाला येथील भारतीय संघाच्या स्टार खेळाडूच्या घरातील आनंद एका क्षणात दु:खात बदलला. गुर्जंतच्या बहिणीने म्हटले की, “ही अभिमानाची बाब आहे की, आपण उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचलो.”
कुटुंबीयांनी म्हटले की, “एक सामना अद्याप बाकी आहे, अपेक्षा आहे की, आपण कांस्य पदक जिंकू.” (Tokyo Olympics 2020 Team India vs Belgium Semifinal Match Indian Player Gurjant Singh Family Reaction)
https://twitter.com/FootBallFanClu7/status/1422433472165994498
गुर्जंतची आई आणि बहीण सामना पलटताच रडू लागल्या. या क्षणी कुटुंबीय म्हणाले की, “जय- पराजय होत असतो, पण पेनल्टी कॉर्नरने सामन्याचे चित्र पालटले.”
नरेंद्र मोदींनी केली कर्णधाराशी चर्चा
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत फोनवर चर्चा केली. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाच्या चांगल्या खेळाची प्रशंसा केली आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड यांनी म्हटले की, “आम्ही सामना जिंकण्याची संधी निर्माण केली. ऑस्ट्रेलियासोबतच बेल्जियम जगातील सर्वात चांगला संघ आहे. या संघांविरुद्ध आपल्या संधीचा फायदा उचलावा लागेल. दुर्देवाने आम्ही हे करू शकलो नाही.”
तब्बल ४९ वर्षांनंतर उपांत्य सामन्यात पोहोचला होता भारतीय संघ
भारतीय संघ तब्बल ४९ वर्षांनंतर ऑलिंपिक्सच्या उपांत्य सामन्यात पोहोचला होता. आता तो ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध कांस्य पदकासाठी गुरुवारी (५ ऑगस्ट) भिडेल.
भारताकडून हरमनप्रीत सिंगने (७ व्या) आणि मनदीप सिंगने (९ व्या) मिनिटाला गोल केले. दुसरीकडे बेल्जियमकडून अलेक्झांडर हेंड्रिक्सने (१९ व्या, ४९ व्या आणि ५३ व्या) मिनिटाला ३ गोल केले. तसेच लोईक लुईपेर्ट पहिल्या आणि जॉन डोहमॅनने ६० व्या मिनिटाला गोल केला.
भारताने शेवटी मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, ते ऑलिंपिक्स १९७२ मध्ये पहिल्यांदा उपांत्य सामन्यात पोहोचले होते. मॉस्को ऑलिंपिक्समध्ये सामने राऊंड रॉबिनच्या आधारावर खेळण्यात आले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर
-हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत
-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव