गतविजेत्या इंग्लंड संघाची वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली. न्यूझीलंड संघाने पहिल्याच सामन्यात त्यांना एकतर्फी 9 विकेट्सने धोबीपछाड दिला. न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र ठरले. त्यांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने दणदणीत विजय मिळवत शानदार सुरुवात केली. संघाचा प्रभारी कर्णधार टॉम लॅथम याने विजयानंतर संघाच्या खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली. त्याने 23 वर्षीय रचिनचे कौतुक केले. रचिनला उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी इंग्लंड संघाला निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 282 धावाच करता आल्या. इंग्लंडचे 283 धावांचे हे आव्हान न्यूझीलंडने 36.2 षटकात 1 विकेट गमावत पार केले. तसेच, 9 विकेट्सने शानदार विजय साकारला. यावेळी न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे (नाबाद 152) आणि रचिन रवींद्र (नाबाद 123) यांनी शतकी खेळी साकारली.
लॅथमकडून कौतुकाची थाप
या विजयानंतर टॉम लॅथम म्हणाला, “रचिन आणि डेवॉन यांनी निश्चितच शानदार भागीदारी साकारली. आमच्या गोलंदाजांनीही शानदार प्रदर्शन केले. त्यांनी 30 षटकांनंतर त्यांच्यावर दबाव बनवला आणि त्यांना 282 धावांवर रोखणे शानदार होते.” पुढे बोलताना तो असे म्हणाला की, “सर्वात आनंदाची बाब म्हणजे, डेवॉन आणि रचिनने चांगली फलंदाजी केली. तसेच गोलंदाजांना आपल्या वरचढ होऊ दिले नाही. रचिनने शानदार खेळी साकारली. मला त्याचा अभिमान आहे.”
कॉनवे आणि रचिनची 273 धावांची विजयी भागीदारी
डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 211 चेंडूत नाबाद 273 धावांची भागीदारी रचली गेली. कॉनवेने सामन्यात 121 चेंडूत नाबाद 152 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 19 चौकारांचा समावेश होता. तसेच, रचिनने 96 चेंडूत 5 षटकार आणि 11 चौकारांच्या जोरावर नाबाद 123 धावा केल्या. विशेष म्हणजे, रचिन विश्वचषकात शतक ठोकणारा न्यूझीलंडचा सर्वात युवा फलंदाज बनला आहे.
न्यूझीलंडने हिशोब केला चुकता
या विजयासह न्यूझीलंड संघाने इंग्लंडचा 4 वर्षांपूर्वी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना मोकळेपणाने शॉट मारू दिले नाहीत. इंग्लंडकडून फक्त जो रूटने सर्वाधिक 77 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय एकालाही अर्धशतक करता आले नाही. (tom latham praised rachin ravindra for his match winning performance in eng vs nz first match in world cup 2023)
हेही वाचा-
लेक असावा तर असा! वादळी अर्धशतकानंतर सेलिब्रेशन करत तिलकने दाखवला टॅटू; म्हणाला, ‘माझ्या आईसाठी…’
धक्कादायक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वीच भारताला तगडा झटका, स्टार खेळाडूला डेंग्यूची लागण