भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने काही महिन्यांतच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये वेगळी ओळख निर्माण केली. तो जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा विरोधी संघाच्या कर्णधाराला प्रश्न पडतो की नेमके क्षेत्ररक्षण कसे ठेवावे आणि गोलंदाजांसमोर याला कसे अडवावे ही अडचण असते. तो मैदानाच्या चौफेर शॉट्स मारण्यात पटाईत आहे. यामुळे त्याचे नाव नवा मिस्टर 360 असे पडले आहे. तसेच आयसीसी टी20 फलंदाजांची क्रमवारी पाहिली तर पहिल्या स्थानावर त्याचेच राज्य आहे. त्याचा प्रभावशाली खेळ पाहून ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने त्याची तुलना विव रिचर्ड्स यांच्याशी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी (Tom Moody) यांनी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची तुलना वेस्ट इंडिजचे दिग्गज विव रिचर्ड्स (Viv Richards) यांच्याशी केली आहे. मूडी यांनी एका स्पोर्ट्स शोमध्ये म्हटले, “सूर्यकुमार हा अप्रतिम फलंदाजी करतो. त्याचा खेळ पाहून मला विवि रिचर्ड्स यांची आठवण येते. त्याची फलंदाजी पाहून त्याचे एकट्याचेच सामन्यावर नियंत्रण दिसते.”
सूर्यकुमारला नुकतेच श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार केले. न्यूझीलंडविरुद्धही त्याला ही जबाबदारी पार पाडायची आहे. त्याचबरोबर त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही निवड झाली आहे. त्याला पहिल्यांदाच कसोटी संघात जागा मिळाली आहे. 2021 ला भारताकडून पदार्पण करणाऱ्या सुर्यकुमारने आतापर्यंत 16 वनडे आणि 45 टी20 सामने खेळले आहेत.
भारताने नुकतेच घरच्या मैदानावर श्रीलंकेचा तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 असा पराभव केला आहे. यामध्ये सूर्यकुमारने दुसऱ्या सामन्यात 51 आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 112 धावा केल्या होत्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20मधील तिसरे शतक होते. या प्रकारामध्ये त्याने आतापर्यंत 46.41च्या सरासरीने 1578 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये त्याची सरासरी 32 असून 384 धावा केल्या आहेत.
टी20मध्ये तर सूर्यकुमार चमकला. वनडेतही तो चांगली कामगिरी करत आहे. यामुळे आता या 32 वर्षीय खेळाडूचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Tom Moody praise Suryakumar Yadav says The way he plays reminds me of Viv Richards)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘… हा तर रणजी ट्रॉफीचा अपमान’, सरफराजला वगळून सूर्याला घेतल्याने भडकले चाहते
अव्वल नंबरी मुंबई सिटी एफसीसमोर बलाढ्य प्रतिस्पर्धी एटीके मोहन बागानचे आव्हान