नुकतीच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने तब्बल ११ वर्षांनी विजेतेपद मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाची कामगिरी उत्तम राहिली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने सेनादल संघावर विजय मिळवला होता.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनीही रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखाली या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत चांगली चमक दाखवली. या स्पर्धेत चमक दाखवणारे हे टॉप तीन महाराष्ट्रीयन खेळाडू:
३. ऋतुराज कोरवी : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात रिशांक देवाडिगा सचिन शिंगाडे,गिरीश इर्नाक, निलेश साळुंखे आणि नितीन मदने सारखे स्टार खेळाडू असूनही ऋतुराज कोरवी याची कामगिरी लक्षात रहावी अशी झाली.
या डिफेंडर खेळाडूने या स्पर्धेत निर्भयपणे खेळताना चांगला खेळ केला. त्याने महत्वाच्या वेळी केलेल्या काही सुपर टॅकलमुळे महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य सामन्यातील प्रवेश सुकर झाला.
त्याचा उपांत्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात डिफेन्स युनिटमधील सहभाग नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखा नव्हता.
२. गिरीश इर्नाक: महाराष्ट्राच्या संघातील स्टार खेळाडूंपैकी असणाऱ्या गिरीश इर्नाककडून चांगल्या कामगिरीचीच सर्वांनी अपेक्षा केली होती. त्यानेही नाराज न करता या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.
डिफेन्स युनिटमध्ये महत्वाची कामगिरी बजावताना त्याने प्रतिस्पर्धी संघातील रेडर्सच्या मनात त्याची धास्ती निर्माण केली होती. त्याने उपांत्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात हाय ५ घेताना महाराष्ट्र संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती.
१. रिशांक देवाडिगा: महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पेलताना रिशांकने कामगिरीही अफलातून केली. त्याने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तरप्रदेश विरुद्ध उत्तम कामगिरी करताना महाराष्ट्राला उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवून दिला.
कर्नाटकविरुद्ध उपांत्य सामन्याचे ३० सेकंद बाकी असतानाही दोन्ही संघांचा स्कोर सारखाच होता. अशा अटीतटीच्या वेळी रिशांक देवाडिगाने २ सेकंद बाकी असताना जबरदस्त खेळ करत २ गुण घेत महाराष्ट्राचा विजय साकार करून महाराष्ट्राचा अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला होता.
तसेच त्याने अंतिम सामन्यातही महत्वाची कामगिरी बजावताना तब्बल १८ गुण घेतले होते. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने कर्णधार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले.