शुक्रवारचा दिवस (१५ ऑक्टोबर) आयपीएलप्रेमींसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी आयपीएल २०२१ ला विजेता संघ मिळाला आहे. दुबई येथे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या हंगामातील अंतिम सामना रंगला होता. चेन्नईने २७ धावांनी हा सामना जिंकत पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. चेन्नई संघाला हे यश मिळवून देण्यात संघातील जवळपास सर्वच खेळाडूंचे योगदान राहिले. परंतु काही खेळाडू पूर्ण हंगामात आपले सर्वोत्कृष्ट देत संघासाठी मॅच विनर ठरले आहेत.
आयपीएल विजेत्या चेन्नई संघातील फलंदाजांच्या प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, युवा क्रिकेटपटू आणि मराठमोळा शिलेदार ऋतुराज गायकवाड याने यंदा चेन्नईच्या फलंदाजी फळीचे नेतृत्त्व केले आहे. साखळी फेरीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. अगदी प्लेऑफमध्येही त्याची बॅट तळपली आहे. त्याच्याबरोबरच फाफ डू प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू अशा खेळाडूंनीही धावांचा रतीब घातला आहे. याच फलंदाजांच्या कामगिरीवर एक नजर टाकूयात
चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज-
१. ऋतुराज गायकवाड-
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) पटकावली. या पुणेकर फलंदाजाने १६ सामने खेळताना ४३.३५ च्या सरासरीने ६३५ धावा कुटल्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकेही ठोकली आहेत.
२. फाफ डू प्लेसिस-
चेन्नई सुपर किंग्स संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसने या हंगामात जबरदस्त फटकेबाजी केली. यासह तो आयपीएल २०२१ मध्ये आणि चेन्नई संघासाठीही सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने कठीण परिस्थितीत संघाला चांगली सुरुवात करून देण्यात मोलाची कामगिरी केली. या हंगामात त्याने १६ सामने खेळताना त्याने ४५.२१ च्या सरासरीने ६३३ धावा कुटल्या आहेत.
३. मोईन अली-
अष्टपैलू खेळाडू मोईन हा आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज राहिला आहे. हंगामातील १५ सामने खेळताना त्याने २५.५० च्या सरासरीने संघासाठी ३५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतकही निघाले आहे.
४. अंबाती रायुडू-
अंबाती रायुडूने मधल्या फळीत चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजी फळीला आधार देण्याचे काम केले आहे. सलामीवीरांच्या विकेट पडल्यानंतर संघाचा डाव सावरताना त्याने २५७ धावा केल्या आहेत. हंगामातील १६ सामन्यांपैकी १३ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने या धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचाही समावेश आहे. तो यावर्षी चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज राहिला आहे.
५. रविंद्र जडेजा-
अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने नेहमीच चेन्नई सुपर किंग्जसाठी खालच्या फळीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. यावर्षीही त्याने १६ सामन्यांपैकी १२ सामन्यांमध्ये एका अर्धशतकाच्या मदतीने २२७ धावा फटकावल्या आहेत. यासह तो चेन्नईकडून आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सनरायझर्सकडून दुर्लक्षित राहिलेल्या वॉर्नरची चेन्नईवर नजर! ट्रॉफी जिंकल्यानंतर बांधले कौतुकाचे पुल
चार वेळच्या आयपीएल विजेत्या धोनीचंच फायनलमध्ये सर्वाधिक तुटलंय हृदय, ‘इतक्यांदा’ राहिलाय उपविजेता
आयपीएल निवृत्तीच्या प्रश्नावर थाला स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी अजूनही सीएसके सोडलेली…’