क्रिकेट इतिहासात कसोटी क्रिकेटनंतर एकदिवसीय क्रिकेट या स्वरुपाची भर पडली. कसोटी क्रिकेटच्या बऱ्याच दशकानंतर एकदिवसीय सामने भरवले जाऊ लागले आणि अल्पावधीतच या मर्यादित षटकांच्या स्वरुपाने क्रिकेटरसिकांना भुरळ पाडली. 50 षटकांच्या सामन्यात बहुतेक वेळा फलंदाज आक्रमक पवित्रा घेत विस्फोटक फलंदाजी करताना दिसतात.
काहींनी तर फार कमी कालावधीत खोऱ्याने धावा काढत मोठमोठे किर्तीमान केले. त्यातीलच एक किर्तीमान म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 10 हजार धावांचा टप्पा गाठणे. या विशेष लेखात आपण कमी डावात 10 हजारांचा टप्पा गाठण्याऱ्या फलंदाजांचा लेखाजोखा घेणार आहोत.
5) जॅक कॅलिस:- 272 सामने
दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू म्हणून जॅक कॅलिस ओळखला जातो. त्याने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 11579 धावा केल्या आहेत. यात 17 शतके आणि 86 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एकदिवस क्रिकेटमध्ये 44.36 च्या सरासरीने आणि 72.89 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. 1995 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या कॅलिसने 2009 मध्ये 10000 धावांचा टप्पा गाठला होता. त्यासाठी त्याने केवळ 272 डाव खेळले होते.
4) रिकी पाँटिंग:- 266 सामने
ऑस्ट्रेलिया संघाचा सर्वकालीन महान कर्णधार आणि दिग्गज फलंदाज म्हणून रिकी पाँटिंग ओळखला जातो. त्याने एकदिवस क्रिकेटमध्ये 42.03 च्या सरासरीने आणि 80.39 च्या स्ट्राईक रेटने एकूण 13704 धावा केल्या होत्या. त्याने 2007 मध्ये आपल्या 266व्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10000 धावांचा टप्पा गाठला होता.
3) सौरव गांगुली :- 263 सामने
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सर्वात जलद 10000 धावा करण्याऱ्या फलंदाजाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपल्या 263 व्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली होती. या डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 41.02 च्या सरासरीने एकूण 11363 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 22 शतक आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे.
2) सचिन तेंडुलकर :- 259 सामने
जागतिक क्रिकेटचा सार्वकालिन महान फलंदाज सचिन तेंडुलकरने जवळजवळ 20 वर्षांपुर्वी सर्वात कमी डावात 10000 धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता. 2001मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला 259वा एकदिवसीय सामना खेळताना हा विक्रम सचिनने प्रस्थापित केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, शतके आणि अर्धशतकांचा विक्रम सचिनच्या नावे आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 18426 धावा केल्याअसून त्यात 49 शतक आणि एका द्विशतकाचा समावेश आहे.
1) विराट कोहली:- 205
भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वात वेगवान दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज म्हणून ओळखला जातो. 2018 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळतांना आपल्या 205 व्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली होती. आतापर्यंत कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 245 डावांमध्ये 59.07च्या उल्लेखनीय सरासरीने 12169 धावा केल्या आहेत, ज्यात 43 शतके आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
असे ३ भारतीय फलंदाज, ज्यांना सलामीला संधी मिळाली तर ठरतील ‘आक्रमक ओपनर’
विश्वचषकात सर्वाधिक धावा करत या ३ भारतीयांनी जिंकली होती ‘गोल्डन बॅट’
कमालच की! ‘या’ १० गोलंदाजांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही टाकला नाही वाईड बॉल