काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले. सर्व संघांनी लिलावाआधी काही खेळाडू मुक्त केले, तर काही खेळाडूंना या हंगामासाठी संघात कायम केले. मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ऍरॉन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, शिवम दुबे अशा काही स्टार खेळाडूंचीही नावे आहेत. त्यामुळे हे काही खेळाडू आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक महागडे ठरु शकतात.
आयपीएल म्हटलं की सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचते. मग खेळाडूंच्या लिलावापासून ते शेवटी कोणता संघ विजयी ठरतो इथपर्यंत सर्व गोष्टींवर प्रेक्षकांचे लक्ष असते. कोणत्या खेळाडूला लिलावात किती रक्कम मिळाली, कोणत्या संघात नवीन खेळाडूची भर पडली किंवा कोणता खेळाडू या संघातून त्या संघात गेला, हे सर्व जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्साही असतो.
आत्तापर्यंत आयपीएलचे १३ हंगाम पार पडले आहेत. या सर्व हंगामात अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली आहे. आपण या लेखात महागडे ठरलेल्या काही भारतीय खेळाडूबद्दल जाणून घेऊ.
आयपीएल इतिहासात महागडे ठरलेले ५ भारतीय खेळाडू –
५. केएल राहुल – ११ कोटी (आयपीेएल २०१८ लिलाव)
केएल राहुलने आयपीएलमध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तो गेले ३ वर्षे किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळत आहे. पंजाबने त्याला ११ व्या हंगामाच्या लिलावादरम्यान तब्बल ११ कोटींची किंमत मोजत संघात घेतले होते. त्यानेही संघाला निराश न करता २०१८ पासूनच्या तिन्ही हंगामात ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाऊस पाडला आहे. २०२० च्या युएईमध्ये पार पडलेल्या हंगामात तर तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने २०२० च्या हंगामात ६७० धावा कुटल्या होत्या. एवढेच नाही तर त्याने या हंगामात पंजाबचे नेतृत्वही केले होते.
४. जयदेव उनाडकट – ११ कोटी ५० लाख आणि ८ कोटी ४० लाख (आयपीएल २०१८ आणि आयपीएल २०१९ लिलाव)
सन २०१८ च्या आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा भारतीय खेळाडू म्हणजे जयदेव उनाडकट. त्याच्या कामगिरीमुळे २०१८मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला ११ कोटी ५० लाखांना संघात घेतले होते. यासह तो आयपीएलच्या ११व्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. पण त्याचे प्रदर्शन चांगले न राहिल्याने त्याला पुन्हा लिलावाला सामोरे जावे लागले.
तरी, २०१९मध्ये परत राजस्थान रॉयल्सने त्याला ८ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलच्या १२व्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
३. रविंद्र जडेजा – १२ कोटी ८० लाख (आयपीएल २०१२ लिलाव)
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा आयपीएलच्या पहिल्या हंगमापासून राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. २०११मध्ये तो कोची टस्कर्स केरळ संघाकडून खेळला. त्यानंतर २०१२साली झालेल्या खेळाडूंच्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्सने १२.८ कोटींना संघात घेतले. यासह जडेजा आयपीएलच्या ५व्या हंगंमातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
२०१६-१७मध्ये जडेजा गुजरात लायन्सचा भाग होता. याशिवाय उर्वरित सर्व हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
२. दिनेश कार्तिक – १२ कोटी ५० लाख (आयपीएल २०१४ लिलाव)
सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असलेला दिनेश कार्तिकला सर्वाधिक किंमत दिली होती की दिल्ली डेअरडेविल्सने. दिल्लीने त्याला २०१४ च्या आयपीएल हंगामात १२ कोटी ५० लाख देऊन खरेदी केले होते. त्या लिलावादरम्यान तो युवराज सिंगनंतर सर्वाधिक रक्कम मिळालेला भारतीय खेळाडू होता. त्याने त्या हंगामात ३२५ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याला २०१५ च्या आयपीएलआधी संघातून मुक्त करण्यात आले. २०१५ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने खरेदी केले; तर २०१६ नंतर तो कोलकाता संघाकडून खेळत आहे.
१. युवराज सिंग – १४ कोटी आणि १६ कोटी (आयपीएल २०१४ आणि आयपीएल २०१५ लिलाव)
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग हा आयपीलच्या पहिल्या ३ हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. त्यानंतर २०११पासून ते २०१३पर्यंत तो पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा भाग होता. पुढे आयपीएल २०१४सालच्या खेळांडूंच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला सर्वात महागड्या किंमतीत म्हणजेच १४ कोटी रुपयांना विकत घेतले.
तर, २०१५मध्ये झालेल्या लिलावात सर्व विक्रमांना मोडून टाकले. युवराजला दिल्ली डेअरविल्सने आयपीएलच्या ८व्या हंगामात १६ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यावेळी तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा विकला गेलेला खेळाडू ठरला होता. हा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे.
एवढेच नव्हे तर, २०१६मध्येही युवराज हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. त्यावेळी सनराइजर्स हैद्राबादने त्याला ७ कोटींना विकत घेतले होते. तसेच त्याच्या संघाने त्याच हंगामात आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : पंजाबला पराभूत करत बडोद्याची अंतिम फेरीत धडक
यश-अपयशाचा सामना करत ऑस्ट्रेलियाचा नंबर एक सलामीवीर झालेला मॅथ्यू हेडन!
धोनीचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची कोहलीला संधी, इंग्लंडविरुद्ध करावा लागेल ‘हा’ कारनामा