महाराष्ट्र आणि मातीतील खेळ यांचे नाते खूप जवळचे आहे. खो-खो असो, कुस्ती असो की कबड्डी असो महाराष्ट्राने या खेळांना नेहमीच आश्रय तर दिलाच आहे पण यांचा मान – सन्मान देखील राखला आहे. विशेषतः कबड्डीमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्राच्या कबड्डीच्या मैदानातील मातीने चांगले खेळाडू पेरले आहेत आणि त्याचा फायदा नेहमीच खेळाडूंना आणि कबड्डीला चांगला झाला आहे. या वर्षात देखील महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अनेक स्पर्धात महाराष्ट्राचे नाव पुढे नेले आहे. विशेषतः प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा चांगला दबदबा राहिला आहे.
या लेखात महराष्ट्राच्या अश्या खेळाडूंचा आढावा घेतला आहे ज्यांनी २०१७ हे वर्ष दणाणून सोडले.
1 रिशांक देवडिगा-
रिशांकला प्रो कबड्डीच्या 5व्या सत्रात युपी योद्धा संघाने 45.5 लाख रुपये किंमत देऊन करारबद्ध केले. यूपीने दाखवलेला विश्वास रिशांकने सार्थ केला.
रिशांकने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात खेळताना रिशांकने 21 सामन्यात एकुण 170 गुण मिळवले होते. त्यातील 165 गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते तर उर्वरित 5 गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते.
युपी संघाने नितीन तोमर याला आराम दिल्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी रिशांकने निभावली आणि यूपीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून दिले.
2 गिरीष इर्नाक-
गिरीशला पुणेरी पलटण संघाने अवघ्या 33.50 लाख रुपये देऊन करारबद्ध केले होते. गिरिषने संघात धर्मराज चेरलाथान आणि संदीप नरवाल यांसारखे हुकमी खेळाडू असून देखील संघाच्या डिफेन्समध्ये सर्वाधिक गुण मिळवले.
या मोसमात खेळताना गिरिषने 21 सामन्यात 69 गुण मिळवले होते. त्यातील 64 गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले होते. या मोसमाच्या बेस्ट डिफेडर्सच्या गिरिषने 64 गुणांसह सहावे स्थान पटकावले होते. त्याच बरोबर प्रो कबड्डीच्या इतिहासात 172 गुणांसह बेस्ट डिफेडर्सच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.
संदीप नरवाल जायबंदी झाल्यावर गिरीषने डिफेन्समधील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि पुणेरी संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून दिले.
3 काशीलिंग आडके-
काशीलिंग आडके प्रो कबड्डीच्या 5व्या मोसमात यु मुंबा या संघाशी जोडला गेला. मागील चार मोसमात तो दबंग दिल्ली संघासाठी खेळत होता. दुसऱ्या मोसमातील सर्वाधिक यशस्वी रेडर ठरलेल्या काशीला या मोसमात म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. असे असताना देखील काशीने 21 सामने खेळताना 122 रेडींग गुण मिळवले होते. सर्वाधिक रेडींग गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत काशीलिंग 13 स्थानावर राहिला.
प्रो कबड्डीमधील साधारण कामगिरी केल्यामुळे त्याला 65व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले नाही.
4निलेश साळुंखे-
निलेश प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा विचार केला तर सर्वाधिक महागडा खेळाडू राहिला होता. निलेशला 49 लाख रुपये देऊन तेलुगू टायटन्सने करारबद्ध केले होते.
राहुल चौधरी आणि राकेश कुमार सारखे मोठे खेळाडू असून देखील आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने टायटन्सला सामने जिंकून दिले. त्यामुळे त्याची राष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी महाराष्ट्राच्या संघात देखील निवड झाली.
निलेशने प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात 21 सामने खेळताना एकुण105 गुण मिळवले होते. त्यातील 98 गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत तर उर्वरित 7 गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले होते.
5 श्रीकांत जाधव-
यु मुंबा संघात अनुप कुमार, शब्बीर बापू, काशीलिंग आडके असे एकापेक्षा एक सरस रेडर होते. तरीदेखील यु मुंबा रेडिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकत नव्हता.
अश्यावेळी श्रीकांतला संघात स्थान देण्यात आले आणि त्याने यु मुंबाला सामने जिंकून देण्यात मोलाची कामगिरी केली.
श्रीकांतने 19 सामने खेळताना 98 रेडींग गुण मिळवले. सुरुवातीच्या काही सामन्यात त्याला बदली खेळाडू म्हणूनच खेळवले गेले होते. त्याचमुळे सामन्यांची संख्या जरी जास्त दिसत असली तरी संधी कमीच मिळाली होती.