प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातील पटणा लेग काल संपला. या लेगमध्ये पटणाने ६ सामन्यापैकी ४ सामने जिंकत घरच्या मैदानाचा चांगला फायदा उचलला. या आधी अशी कामगिरी फक्त गुजरातच्या संघाने केली होती. गुजरातने त्याच्या घरच्या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. पटणा लेग हा रेडर्सचा लेग होता कारण या लेगमध्ये रेड गुणांचा पाऊस झाला. प्रदीपने ६ सामन्यापैकी ५ सामन्यात सुपर १० केला आहे. पाहुयात कोण आहे पटणा लेगमधील टॉप ५ रेडर्स.
५. दीपक नरवाल ( बंगाल वोरीयर्स )
या लेगमध्ये बंगालने फक्त एकच सामना खेळला तो ही घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पटणा पायरेट्स यांच्या विरुद्ध. या सामन्यात बंगालने पटणाला बरोबरीत रोखले. दीपक नरवालला या सामन्यात राखीव ठेवण्यात आले होते आणि शेवटचे १० मिनिटे राहिले असताना मैदानात येऊन सुद्धा त्याने सुपर १० केले. त्याने पटणाच्या डिफेन्सला सळो की पळो करून सोडले होते.
४. सचिन (गुजरात फॉर्च्युन जायन्टस )
या मोसमाचा सर्वात प्रतिभावान युवा रेडर जर कोणी असेल तर तो म्हणजे सचिन. या लेगमध्ये गुजरात आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात सचिनने सुपर १० केला आणि गुजरातने मुंबईसारख्या बलाढ्य संघावर मात केली. मुंबईला या मोसमात गुजरातला एकदाही हरवत आलेले नाही याचे एक प्रमुख कारण सचिन आहे.
३. नितीन तोमर ( यूपी योद्धाज )
या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू म्हणजेच नितीन तोमरनेही या लेग मध्ये २ सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. या लेगमध्ये यूपीच्या संघाने २ सामने खेळले आणि दोन्ही सामने पाटणाविरुद्धच खेळले. यूपीने एक सामना जिंकला तर एका सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. पण दोन्ही सामन्यात कर्णधार नितीन तोमरने सुपर १० केले. शेवटच्या सामन्यात जर नितीन तोमरने चांगली कामगिरी केली नसती तर नक्कीच पटणा घरच्या मैदानावर एकही सामना हरली नसती.
२. मोनू गोयत ( पटणा पायरेट्स )
मोनूने पटणा पायरेट्सकडून या मोसमात १४४ गुण मिळवले आहेत. मोनू हा पटणा पायरेट्सचा दुसरा रेडर आहे आणि त्याने प्रदीप नरवालाल उत्तम साथ दिली आहे. प्रो कबड्डीच्या या मोसमात काही प्रमुख रेडरचे ही मोनू एवढे गुण नाहीत. होम लेग मधील ६ सामन्यात मोनूने ५४ गुण मिळवले आहेत. त्याची सरासरी ९ गुणांची आहे.
१. प्रदीप नरवाल ( पटणा पायरेट्स )
प्रदीप नरवाल हा या मोसमतील विक्रमवीर म्हणायला हरकत नाही. प्रदीप नरवालने या मोसमात एका मोसमात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच बरोबर तो एका मोसमात २०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू बनला. प्रदीपने या मोसमात स्वतःची छाप आपल्या अफलातून कामगिरीतून पाडली आहे. पटणा लेगमधील ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात त्याने सुपर १० केले आहेत. प्रदीप नरवालने या मोसमात १४ सुपर १० केले आहेत, हा ही एक विक्रम आहे. या लेगमध्ये त्याला डोक्याला दुखापतही झाली पण त्याच्या फॉर्मवर याचा काही परिणाम झाला नाही.