प्रो कबड्डीचा पाचवा मोसम प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. पाचवा मोसम हा रेडर्सने गाजवला आहे. या मोसमात रेडर्सने मागील सर्व मोसमातील रेडींगमधील विक्रम मोडले आहेत. या मोसमात रेडर्सने उत्तम कामगिरी करत प्रो कबड्डीमध्ये आपले नाव चमकत राहणार याची दक्षता घेतली आहे. काही रेडर्स यांनी प्रो कबड्डीमधील खूप मोठे विक्रम केले पण ते त्यांच्या संघाना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देऊ शकले नाहीत.
या लेखात आपण चर्चा करू अश्या ५ रेडर्सशी ज्यांच्या कामगिरीच्या जोरावर त्यांचे संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.
#५ सचीन- (गुजरात फॉरचून जायन्टस )
गुजरात संघाची खरी ताकद त्यांचे डिफेंडर्स आहेत हे सर्व मानतात. गुजरात संघ सामने जिंकतो तो त्यांच्या दमदार डिफेंडर्सच्या खेळामुळे, हे जरी सत्य असले तरी गुजरात संघाच्या विजयासाठी रेडर्स देखील डिफेंडर्सच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करतात. या संघातील रेडर सचीन याचा प्रो कबड्डीचा हा पहिलाच मोसम आहे. तरीदेखील त्याने रेडींगमधील कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत.
सचीनने खेळल्या २२ सामन्यात १३९ गुण मिळवले आहेत. त्याचे हे गुण जरी २०० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या रेडर्सच्या तुलनेत कमी दिसत असले तरी त्याच्या कामगिरीतील सातत्य हे गुजरात संघाच्या विजयाचे गमक बनले आहे. त्याच्या रेडींगचा सामन्यावर होणारा परिणाम खूप मोठा आहे.
#४ दीपक निवास हुड्डा – (पुणेरी पलटण )
पुणेरी पलटण संघ देखील या मोसमातील सर्वात उत्तम डिफेन्स असलेल्या संघापैकी एक संघ आहे. या संघात धर्मराज चेरलाथन, संदीप नरवाल, गिरीश एर्नेक असे एकापेक्षा एक डिफेंडर्स आहेत. या संघात दोनच मुख्य रेडर आहेत त्यातील एक म्हणजे पलटणचा कर्णधार दीपक हुड्डा. या मोसमात दिपकची कामगिरी मागील मोसमाच्या तुलनेत थोडी खराबच झाली आहे. तरी देखील त्याने २२ सामन्यात रेडींगमध्ये १५४ गुण मिळवत पुणेरी पलटण संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात यश मिळवले आहे.
मोक्याच्यावेळी त्याने यु मुंबा, हरयाणा स्टीलर्स आणि जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध सुपर टेन करत पहिल्या स्थानासाठी संघाची दावेदारी मजबूत केली होती. परंतु गुजरात विरुद्धचा सामना गमावल्याने त्यांना पहिल्या स्थानावर काबीज होता आले नाही.
#३ नितीन तोमर -(युपी योद्धा )
युपी योद्धाचा कर्णधार, प्रो कबड्डीमधील सर्वात महागडा खेळाडू असणारा नितीन तोमर याने युपीला पहिल्याच मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून दिले आहे. उत्तम डिफेंडर्सची कमी आणि ऑलराऊंडर राजेश नरवाल याला या मोसमात आपला ठसा उमटवण्यात आलेले अपयश अशी अवघड परिस्थिती असतानाही त्याने जबदस्त कामगिरी केली.
नितीन तोमर याने रिशांक देवाडीगा याला सोबतीला घेऊन उत्तम कामगिरी केली. या मोसमात नितीनने १९ सामने खेळताना १६० रेडींग गुण मिळवले आहेत. नितीन तोमर आणि रिशांक देवाडीगा यांनी युपीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
#२ मनिंदर सिंग -(बेंगाल वॉरियर्स)
पहिल्या मोसमानंतर मनिंदर प्रो कबड्डीपासून दुरावला होता. त्याने पाचव्या मोसमात पुनरागमन केले. या मोसमात खेळताना त्याने बेंगालचा चाहता जाँग कून ली याला देखील कामगिरीत मागे टाकले आणि बेंगालचा आवडता खेळाडू बनला आहे. या मोसमात त्याने १९ सामने खेळताना १७२ गुण मिळवले आहेत.
मनिंदर सिंग याने या मोसमात ८ सुपर टेन केले आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचलेल्या संघातील फक्त प्रदीप नरवाल हाच खेळाडू सुपरटेन आणि गुणांमध्ये त्याच्या पुढे आहे.
#१ प्रदीप नरवाल- (पटणा पायरेट्स)
प्रो कबड्डीमधील रेडींगच्या विक्रमांचा बादशाह प्रदीप नरवाल याने २७४ रेडींग गुण मिळत पटणा पायरेट्स प्ले ऑफमध्ये स्थान मिळवून देण्यात खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्याने या मोसमात अनुप कुमारचा एका मोसमात सर्वाधीक एकूण गुणांचा विक्रम मोडला होता. त्यानंतर त्याने २०० गुण करणारा पहिला खेळाडू ठरला. त्यापुढे तो २५० पेक्षा जास्त गुण मिळवणारा पहिला आणि एकमेव खेळाडू बनला.
त्याच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर पटणा संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. प्ले ऑफमध्ये त्याच्याकडून अश्याच प्रकारच्या कामगिरीची अशा पटणाचे चाहते करत असणार आहेत.