प्रो कबड्डीचा हा मोसम रेडर्सच्या आणि विशेषतः पटणाचा कर्णधार प्रदीप नरवालचा राहिला आहे. तीन महिन्याच्या या मोसमात असे काही डिफेंडर होते ज्यांनी रेडर्सना प्रत्येक गुण मिळवण्यासाठी झगडायला लावले.
कबड्डीमध्ये रेडर हे स्वतःच्या बळावर गुण मिळवतात तर डिफेंडर हे बाकी डिफेंडरच्या मदतीवर गुण मिळवतात. डिफेंडर हे सांघिक कामगिरीवर अवलांबून असतात.
प्रो कबड्डीमध्ये या मोसमात डिफेंडरच्या अनेक जोड्या होत्या. गुजरातमध्ये अबुझार आणि फझल, पुण्यामध्ये संदीप आणि गिरीष, हरियाणामध्ये सुरेंदर आणि मोहित या डिफेंडर्सनी जोडीत मिळून अनेक शिकार केले.
रेडर्सने गाजवलेल्या या पाचव्या मोसमात पाहुयात कोण आहेत पाच सर्वोत्तम डिफेंडर्स.
५. अबुझर मिघानी (गुजरात फॉरचूनजायन्टस)
इराणच्या या डिफेंडरचा हा प्रो कबड्डीतील पहिलाच मोसम होता. इराणचाच त्याचा साथीदार फझल आत्राचली ही त्याच्या बरोबर याच संघात होता.
अबुझर या मोसमात राईट कॉर्नर या जागेवर खेळला आणि सर्व लेफ्टरेडर्सना सळो की पळो करून सोडले. गुजरातचा संघ हा त्यांच्या डिफेन्सवर जास्त अवलांबून होता आणि असे म्हणायला हरकरत नाही की त्यांच्या डिफेन्सनेच त्याना अंतिम सामान्यपर्यंत नेले.
पहिल्याच मोसमात अबुझरने रेडर्समध्ये अशी दहशत करून ठेवली की रेडर्स त्याच्या जवळ जायला ही घाबरत होते. या मोसमातील सर्वोत्तम रेडर प्रदीप नरवालला अबुझारने शेवटच्या सामान्यपर्यंत रोखून धरले होते. जर शेवटच्या सामन्यात त्याने प्रदीपला रोखले असते तर गुजरातला पदर्पणाच्याच मोसमात चषक जिंकण्यापासून कोणीच आडवले नसते.
डिफेन्स गुण-६५
सरासरी- २.७१
हाय ५ – २
सुपर टॅकल -२
४. जयदीप (पटणा पायरेट्स)
या मोसमात प्रत्येक संघात १ प्रमुख रेडर होता. पटणा पायरेट्सकडे प्रमुख रेडर म्हणून प्रदीप नरवाल होता तर डिफेन्सची जबाबदारी सचिन शिंगाडे आणि विशाल माने यांच्यावर होती.
विशाल माने आणि सचिन शिंगाडे सारख्या अनुभवी डिफेंडरमध्ये पटणाकडून सर्वोत्तम कामगिरी केली जयदीप या नव्या खेळाडूने.
पहिल्या काही सामन्यात पटणाचे दोन्ही अनुभवी डिफेंडर त्यांच्या लयीत दिसत नव्हते. तेव्हा या खेळाडूने चांगली कामगिरी करत पटणाच्या विजयात हातभार लावला.
प्रदीप नरवाल सारखा अफलातून रेडर जेव्हा संघात असतो तेव्हा डिफेंडर्सच्या वाट्याला खूप कमी वलय येते. परंतु आपल्या जबदस्त कामगिरीच्या बळावर जयदीपने सर्वांचे लक्ष वेधण्यात यश मिळवले. त्याने खेळलेल्या २६ सामन्यात ७१ मिळवले. त्यातील सर्व गुण त्याने डिफेन्समध्येच मिळवले आहेत.
डिफेन्स गुण -७१
सरासरी- २.७३
हाय ५- ५
सुपर टेकल- ५
३. विशाल भारद्वाज (तेलुगू टायटन्स)
तेलुगू टायटन्ससाठी हा संपूर्ण मोसम निराशाजनक ठरला आहे. त्यांचा कर्णधार आणि प्रमुख रेडर राहुल चौधरी याला संघाला विजयी मार्गावर नेण्यात सतत अपयश आले. या मोसमात अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न उराशी बाळगून उतरलेल्या तेलुगू टायटन्सला प्ले ऑफमध्ये देखील स्थान मिळवता आले नाही.
टायटन्ससाठी एक चांगली गोष्ट जी या वर्षी त्यांना मिळाली ती म्हणजे डिफेंडर विशाल भारद्वाज. विशालने तेलगुच्या संघात लेफ्ट कॉर्नरची जागा सांभाळली. राणा सारख्या अनुभवी डिफेंडरला एका साथीदारची गरज होती आणि ती गरज त्याने पूर्ण केली. या मोसमातील सर्वात प्रभावी युवा कबड्डीपटूपैकी एक म्हणून त्याचे नाव घेतले जाते.
डिफेन्स गुण-७१
सरासरी- ३.२३
हाय ५- ५
सुपर टेकल- ३
२. सुरजित सिंग (बेंगाल वॉरियर्स)
बंगालचा कर्णधार सुरजित सिंगकडे या संघाच्या डिफेन्सची जबाबदारी होती. मागील सर्व मोसमापेक्षा या मोसमात बंगालचा संघ हा वेगळा होता. या संघात भरपूर रेडर होते. पण सुरजीत सिंगला साथ देण्यासाठी चांगला डिफेंडर नव्हता.
कौशल्यपूर्ण डिफेंडर्सची संघात नसल्याने बंगाल झोनमध्ये पहिल्या क्रमांकावर असून सुद्धा अंतिम सामना गाठू शकला नाही. बंगालच्या कर्णधार सुरजीत सिंगने नेतृत्वाबरोबरच डिफेन्समध्ये ही चांगली कामगिरी करत बंगालला प्ले ऑफपर्यंत नेले.
डिफेन्स गुण – ७६
सरासरी – ३. १७
हाय ५- ९
सुपर टेकल- ४
१. सुरेंदर नाडा (हरयाणा स्टीलर्स)
हरयाणा संघाचा कर्णधार सुरेंदर नाडा प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील पहिल्या काही सामन्यात अफलातून लयीत दिसला. त्याने सलग ५ सामन्यात ५ हाय ५ केले आणि इतिहास घडविला.
हरयाणा स्टीलर्सचा संघ प्ले ऑफपर्यंत मजल मारू शकला यात मोलाचा वाटा कर्णधार सुरेंद्र नाडाचा होता. कर्णधार बनल्यानंतर नाडाच्या खेळामध्ये एक वेगळीच स्थिरता दिसली.
युवा रेडर आणि अनुभवी डिफेंडर या दोन्ही गोष्टींचा हरयाणाच्या संघात बरोबर समतोल साधला गेला. त्यामुळे हरयाणा पदर्पणाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले.
डिफेन्स गुण- ८०
सरासरी- ३.८१
हाय ५- ९
सुपर टेकल- ६