लवकरच आयपीएलच्या २०२२ हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. त्याची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तसे संकेत दिले आहेत. या वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात अनेक अनकॅप्ड खेळाडू आपली चमक दाखवू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेमध्ये अनेक भारतीय खेळाडूंची कामगिरी जबरदस्त राहिली होती आणि आता लिलावात या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. जाणून घेऊ या त्या पाच खेळाडूंबद्दल ज्यांच्यावर मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते.
१. तन्मय अग्रवाल
या यादीत पहिले नाव आहे हैदराबादच्या तन्मय अग्रवालचे. तन्मयने यावर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. या स्पर्धेदरम्यान खेळल्या गेलेल्या ७ सामन्यात त्याने ५५ च्या सरासरीने ३३४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४८.४८ इतका राहिला आहे. तन्मय २०१८ साली हैदराबाद संघाचा भाग होता. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
२. किशन लिंगडोह
आसामकडून खेळणाऱ्या किशन लिंगडोहने यावर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या पाच सामन्यात ६१.४७ च्या सरासरीने २४७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४२.७७ इतका होता.
३. अक्षय कर्णेवार
विदर्भाकडून खेळणाऱ्या २९ वर्षीय अक्षय कर्णेवारने यंदा सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्णेवारने या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यात ४.३४ च्या इकॉनॉमी रेटने १३ बळी घेतले. यादरम्यान त्याने ५ धावांत ४ गडी बाद करत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. सिक्कीमविरुद्ध त्याने हॅट्रिकही घेतली होती.
४. अश्विन हेब्बर
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत आंध्र प्रदेशकडून खेळणारा फलंदाज अश्विन हेब्बर याने या स्पर्धेत दमदार फलंदाजी केली आहे. त्याने पाच सामन्यांत ९३ च्या सरासरीने २७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १०३ अशी होती. त्याने या स्पर्धेत एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले.
५. दर्शन नळकांडे
या यादीत शेवटचे नाव आहे ते विदर्भाकडून खेळणाऱ्या २३ वर्षीय वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेचे. या स्पर्धेत त्याने ८ सामन्यात १३ विकेट घेतल्या. त्याने कर्नाटकविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, शेवटच्या षटकात चार चेंडूत सलग चार विकेट्स घेतल्या.