आयसीसी टी२० विश्वचषक १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे भारतात होणारी हा विश्वचषक आता यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला गेला आहे. टी२० क्रिकेटमध्ये अवघ्या काही क्षणात सामन्याचे चित्र बदलत असते. अशावेळी सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात मैदानातील खेळाडूंना स्वत:वर आत्मविश्वास ठेवावा लागतो. कारण संघासाठी सामन्याचा शेवट करणे सामन्यातील सर्वात कठीण कामांपैकी एक असते. अंतिम षटकापर्यंत जाणारे सामने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात आणि टी२० मध्ये हे चित्र काही दुर्मीळ नाही. आगामी टी२० विश्वचषक स्पर्धा खेळाडूंसाठी मोठे आव्हान असणार आहे. टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आपण या लेखात ४ अशा संघांवर नजर टाकणार आहोत, ज्यांच्याकडे जगातले सर्वोत्कृष्ट फिनिशर आहेत.
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० विश्वचषकासाठी त्यांचा संघ घोषित केला आहे. संघात काही प्रमुख खेळाडूंनी पुनरागमन केले आहे. जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाच्या फिनिशर्सचा विषय निघतो, तेव्हा ग्लेन मॅक्सवेलचे नाव सर्वात आधी घेतले जाते. त्याचे फलंदाजी कौशल्य सर्वांनाच माहित आहे आणि त्याच्याकडे सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे. मॅक्सवेलने नेहमीच हे स्पष्ट केले आहे की, तो ऑस्ट्रेलिया संघाचा एक अप्रतिम फिनिशर आहे. मॅक्सवेलने ‘मॅन इन यलो’साठी ७२ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७८० धावा केल्या आहेत आणि ३१ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याच्याव्यतिरिक्त संघाकडे मार्कस स्टोइनिस आणि पॅट कमिंस हेदेखील पर्याय आहेत. स्टोइनिस जलद धावा करू शकतो आणि संघासाठी गेम-चेंजर ठरू शकतो. कमिंसने आयपीएलमध्ये केकेआरसाठी सीएसकेविरुद्ध त्याच्या उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केलेले आहे. त्यावरुन तोही संघाला चांगला शेवट करुन देऊ शकतो.
वेस्टइंडीज
वेस्टइंडीज संघाकडे खूप विस्फोटक फलंदाज आहेत. त्यांचे फलंदाज त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये सामन्याचा शेवट करतात. आंद्रे रसलने अनेकदा तो फलंदाजीमध्ये काय कमाल करू शकतो, हे दाखवले आहे. रसलने शेवटच्या षटकात दबाव असूनही बचावात्मक खेळी न करता अनेकदा चेंडू स्टेडियमच्या बाहेर मारला आहे. तो संघासाठी डावाच्या सुरुवातीलाही फलंदाजी करू शकतो. ६२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने ७१६ धावा आणि ३६ विकेट्स मिळवल्या आहेत.
त्यांच्या संघात फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची कमतरता नाही. त्यांच्याकडे ड्वेन ब्रावो उत्तम फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. वेस्टइंडीजसाठी किरोन पोलार्ड दुसरे महत्वाचे नाव आहे. तो संघाचा खूप महत्वाचा खेळाडू आहे. त्याने ८८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १३७८ धावा केल्या आहेत.
भारत
भारतीय संघात अनेक खेळाडू आहेत, जे संघाच्या कठीण काळात फायदेशीर ठरू शकतात. फिनिशर्समध्ये रवींद्र जडेजाचे नाव महत्वाचे आहे. त्याने दिवसेंदिवस फटकेबाजी आणि स्ट्रोक विकसित केले आहेत. तो संघात खालच्या फळीत फलंदाजी करण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. दुसरे नाव आहे रिषभ पंत याचे. तो सध्या त्याच्या खराब फार्मशी झगडत आहे. परंतु टी२० विश्वचषकापर्यंत तो लयीत येऊ शकतो.
हार्दिक पांड्या सध्या त्याच्या दुखापतीमुळे चांगल्या फार्ममध्ये नाही. असे असले तरीही, त्याला हलक्यात घेता येणार नाही. तो मैदानात खेळायला उतरल्यावर कोणत्याही गोलंदाजाला घाम काढू शकतो. पांड्याने त्याच्यातील क्षमतेचे अनेकदा प्रदर्शन केलेले आहे. भारतीय टी२० संघाचा फिनिशरच्या रूपात त्याच्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असणार आहेत. त्याने टी२० क्रिकेटमध्ये ४९ सामन्यांमध्ये ४८४ धावा केल्या आहेत.
इंग्लंड
इंग्लंड सर्वात मजबूत संघांपैकी एक संघ आहे. त्याच्याकडे काही अप्रतिम फिनिशर्स आहेत. इंग्लंडच्या बेन स्टोक्सने २०१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यांमध्ये फिनिशरच्या रूपात अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्यानंतर ऍशेज मालिकेतही त्याने चांगले प्रदर्शन केले. त्याने वेळोवेळी संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
इंग्लंडकडे त्याच्याव्यतिरिक्त मोईन अलीदेखील महत्वाचा फिनिशर आहे. तो गोलंदाजांविरोधात आक्रमक फलंदाजी करू शकतो आणि संघासाठी महत्वाची खेळी करू शकतो. संघाकडे सॅम करन आणि टाॅम करन हे एक चांगला पर्यायही आहेत. सॅम करनकडे वेगाने धाव करण्याची आणि मोठे शाॅट खेळण्याची क्षमता आहे. त्याने सीएसकेसाठी अशी खेळी केलेली आपण पाहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तानविरुद्ध खेळताना माझे रक्त गरम व्हायचे’, सेहवागने सांगितल्या वनडे पदार्पणाच्या आठवणी