आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पडला. या लिलावात देश-विदेशातील अनेक खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी बोलीही याच लिलावात लागली. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरीसला तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावत राजस्थान रॉयल्सने खरेदी केले.
यासह मॉरीस आयपीएलमधील सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या आधी पहिल्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. आजच्या या लेखात आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या दहा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
१) विराट कोहली –
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे. आयपीएल २०१८ मध्ये बंगलोरच्या संघाने त्याला १७ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले होते.
२) ख्रिस मॉरीस –
यंदाच्या लिलावात लागलेल्या तब्बल १६.२५ कोटी रुपयांच्या बोलीने अष्टपैलू ख्रिस मॉरीस या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या बोलीने मॉरीस आयपीएल इतिहासात सर्वाधिक बोली लागलेला खेळाडूही ठरला आहे. त्याने माजी भारतीय फलंदाज युवराज सिंगला या बाबतीत मागे टाकले.
३) पॅट कमिन्स –
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मागील हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्याला १५.५ कोटी रुपयात आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यामुळे आयपीएलमधील तो सध्या तिसरा सर्वाधिक महागडा खेळाडू आहे.
४) एमएस धोनी –
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासातील एक सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून खेळण्यासाठी त्याला १५ कोटी रुपये मिळत असल्याने तो यंदाच्या आयपीएलमधील चौथा सर्वाधिक महागडा खेळाडू आहे.
५) रोहित शर्मा –
या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. आपल्या संघाकडून खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स त्याला १५ कोटी रुपये अदा करतात. रोहित शर्मा चार आयपीएल विजेतेपदांसह या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार देखील आहे.
६) रिषभ पंत –
भारताचा उदयोन्मुख खेळाडू रिषभ पंत आयपीलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळतो. त्याला दिल्लीने मागील हंगामात १५ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले होते. त्यामुळे या यादीत तो सहाव्या स्थानावर आहे.
७) कायले जेमिसन –
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायले जेमिसन यावेळी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये भाग घेणार आहे. त्याला यंदाच्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने तब्बल १५ कोटींची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
८) ग्लेन मॅक्सवेल –
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आयपीएल लिलावात कायमच चर्चेत असतो. गेले काही हंगाम त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. मात्र तरीही या हंगामात १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत बंगलोरच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.
९) झाय रिचर्डसन –
बिग बॅश लीगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीचे फळ ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचर्डसनला यंदाच्या आयपीएल लिलावात मिळाले. त्याला पंजाब किंग्जने १४ कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील करून घेतले. त्यामुळे आयपीएलमधील सर्वाधिक महागड्या खेळाडूंच्या यादीत तो नवव्या स्थानावर आहे.
१०) डेव्हिड वॉर्नर –
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या यादीत दहाव्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळण्यासाठी त्याला १२.५ कोटी रुपये मिळतात. वॉर्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे.
महत्वाच्या बातम्या:
इंजीनियरिंग केलेला अश्विन प्रत्येक सामन्यानंतर काय लिहितो? एकदा वाचून पाहा मग कळेलं
बुमराह आणि शमीला टी२० संघातून डच्चू देण्यामागचे कारण काय? घ्या जाणून
रॉबिन उथप्पाची बॅट तळपली; आयपीएल २०२१ मध्ये धोनीच्या सीएसकेला जिंकून देणार चौथे जेतेपद?