आयपीएलच्या १३ व्या हंगामातील नववा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाला सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अगरवाल या सलामी फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली.
दरम्यान अगरवालने फटकेबाजी करताना दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर २ षटकार ठोकले. या षटकारांसह त्याने आपलाच विक्रम मोडला आहे.
त्याने आयपीएल २०१९ ते २०२० हंगामादरम्यान २० पेक्षा अधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी त्याने आयपीएल २०१३ ते २०१८ या हंगामांदरम्यान १९ षटकार ठोकले होते, तर आयपीएलच्या आपल्या पहिल्या २ हंगामात म्हणजेच २०११ ते २०१२ या हंगामातही त्याने १९ षटकार ठोकले होते.
मयंकने आयपीएल २०११ ते २०१९ या हंगामादरम्यान खेळताना ७२ डावांमध्ये केवळ एकदा एका डावात सर्वाधिकवेळा ४ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार हे ठोकले आहेत. त्यानंतर त्याने आयपीएल २०२०च्या आपल्या केवळ ३ डावात दोनदा ४ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकले आहेत.
मयंकने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८० सामने खेळले आहेत.






