नशिबाचा एक निर्णय, एक अनपेक्षित संधी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या प्रवासाला मिळाले नवे पंख; अशी कहाणी कुणीच भाकीत केली नसेल, हे सर्व एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखेच वाटते. आयुष्यात असे वळण येईल याची रजत पाटीदार आणि खुद्द आरसीबी संघाशी संबंधित व्यक्तिंनीही कल्पना केली नसेल. 2022 च्या आयपीएल लिलावामध्ये रजतला कोणीही खरेदी न केल्याने तो निराश झाला होता. या निराशेच्या वेळी त्याला आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मे 2022 मध्ये रजतच्या लग्नाची तारिख आधीच ठरली होती, त्याचवेळी त्याला माईक हेसन (तेव्हाचे आरसीबीचे प्रशिक्षक) यांचा फोन आला. दुखापतग्रस्त विकेटकीपर लवनीत सिसोदियाच्या जागी रजतला संघात घ्यायचे ठरवले. संपूर्ण हंगामात बाकावर बसावे लागेल, याच्या भीतीने रजतने ही ऑफर नाकारण्याचा विचार केली. त्याच्या कुटुंबाने त्याची समजूत घातली आणि रजत आरसीबी संघात दाखल झाला. त्यानंतर पुढे जे काही घडले, आता संपूर्ण जगाला माहितच आहे.
2022 च्या हंगामात रजतला आरसीबीने बाकावर बसू दिले नाही. त्याने आठ सामने खेळले आणि त्या हंगामात तो आरसीबीच्या सर्वात यशस्वी अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक ठरला. त्याने 333 धावा केल्या. यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या 54 चेंडूंत केलेल्या नाबाद 112 धावांचा समावेश आहे. त्याचबरोबर तो या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला.
पुढील हंगामात रजतला कायम ठेवण्याचा निर्णय घेत असताना मोठा धक्का बसला, त्याला टाचेची दुखापत झाली आणि तो 2023 हंगामामधून बाहेर झाला. नंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत भारतीय संघात पदार्पण केले. 2023 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय वनडे संघात आणि 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केले.
रजतने 2024 मध्ये आयपीएल पुनरागमन केले आणि 15 सामन्यांमध्ये 395 धावा केल्या. यावेळी त्याची फिरकी गोलंदाजांविरुद्ध षटकार मारण्याची क्षमता क्रिकेटविश्वाने पाहिली.
रजतसाठी 2025 हंगाम त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. आरसीबीचे नेतृत्व गट बदलताना दिसले. संघाने फाफ डु प्लेसिसला मुक्त केले, तर विराट कोहलीला कायम राखत संघाची सूत्रे रजतकडे सोपवली, ज्याला संघाने 11 कोटी रुपयांना कायम ठेवले.
रजतने आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश कार्तिक आणि मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर यांच्यासोबत मिळून प्रत्येक विभागात मजबूत असलेला संघ तयार केला. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांचा अनुभव, रजत आणि देवदत्त पडिक्कल यांची आक्रमक फलंदाजी, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड आणि जितेश शर्मा यांच्यासारखे फिनिशर्स. तसेच अष्टपैलू कृणाल पंड्या यांच्यामुळे संघ परिपूर्ण आणि ताकदवान दिसला. संघात 17 वर्षांपासून कामगिरीत सातत्य राखणारा विराट तर होताच. यांनीच मिळून संघाचा 17 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला आणि 2025 हंगामात आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. आता संघ सलग दुसऱ्यांदा विजेता बनला आहे.
आयपीएल 2026 जिंकताच रजतने कर्णधार म्हणून इतिहास रचला आहे. तो या स्पर्धेत आपल्या पहिल्या दोन हंगामात सलग दोन विजेतेपद जिंकणारा पहिला कर्णधार ठरला. आजपर्यंत इतर कोणत्याही कर्णधाराने ही कामगिरी केलेली नाही.






