टी-20 क्रिकेट म्हणजे फलंदाजांचा खेळ, असे अनेकदा बोलले जाते. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय ही ओळख पुसण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये बीसीसीआय येत्या काळात महत्वाचा बदल करणार आहे. शनिवारी (8 जुलै) बीसीसीआयने घोषणा केली की, आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोलंदाजाला एका षटकात दोन बाउंसर टाकता येतील.
बीसीसीआयने हा निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेतल्याचे दिसते. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) म्हणजेच आयपीएलमध्येही येत्या काळात गोलंदाजांना प्रत्येक षटकात दोन बाउंसर टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकते. कारण असेच काहीसे मागच्या वर्षी इंपॅक्ट प्लेअरच्या नियमाबाबत झाले होते. आयपीएलमध्ये हा नियम वापरात आणण्याआधी बीसीसीआयने सय्यत मुश्ताक अली ट्रॉफीत ही नियम वापरला होता. अशात बाउंसरबाबतचा हा निर्णय मुश्ताक अली ट्रॉफीत यशस्वी ठरला, तर आगामी आयपीएलमध्येही याचा वापर केला जाऊ शकतो. शुक्रवारी (7 जुलै) बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. माहितीनुसार याच बैठकीत हा निर्णय घेतला गेला. (Bouncer rule in Syed Mushtaq Ali Trophy)
काय आहे नवीन नियम?
टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला एका षटकात जास्तीत जास्त एकच बाउंसर टाकण्याची परवानगी होती. वनडे आणि कसोटीत मात्र, षटकात दोन बाउंसर टाकता येतात. अशात बीसीसीआयने वनडे आणि कसोटी क्रिकेटप्रमाणेच सय्यत मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीतही एका षटकात दोन बाउंसरला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमधील स्पर्धा अधिकच रमोंचक होताना दिसू शकते. यावर्षी पार पडलेल्या आयपीएल 2023मध्ये बहुतांश सामन्यांमध्ये संघ 200 पेक्षा मोठी खेळी करताना दिसले. एकंदरीतच गोलंदाजांपेक्षा फलंदाजांचे पारडे जड वाटत होते. अशात या नवीन नियमामुळे गोलंदाजी विभागाला अधिकची ताकद मिळू शकते. असे असले तरी, येत्या काळात या नियमामुळे खेळावर काय परिणाम होते, याकडे जाणकारांचे लक्ष असेल.
दरम्यान, माध्यमांमध्ये अशाही माहिती दिली जात आहे की, बीसीसीआयच्या बैठकीत भारतातील वेगवेगळ्या स्टेडियमचे नूतनीकरण केले जाणार आहे. आगामी वनडे विश्वचषक खेळवला जाणाऱ्या 10 स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम आधी केले जाईल, तर राहिलेल्या स्टेडियमचे काम दुसऱ्या टप्प्यात पार पडेल, असेही सांगितले गेले. (Two bouncers per over allowed by BCCI in Syed Mushtaq Ali Trophy )
महत्वाच्या बातम्या –
धोनीला भेटण्यासाठी आलेल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण! थालाने ‘अशा’ पद्धतीने स्वीकारल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
VIDEO । बेअरस्टोसोबत भांडण! 100व्या कसोटीत फेल ठरलेल्या स्टीव स्मिथचा राग अनावर