जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ बुधवारी (२ जून) इंग्लंडला रवाना झाला. इंग्लंडचे उड्डाण भरण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे पत्रकारांना सामोरे गेले. दोघांनीही पत्रकारांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. त्याचवेळी विराटने भारतीय संघात दोन कर्णधारांच्या शक्यतेबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
दोन कर्णधार काळाची गरज
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी प्रथेनुसार कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांना सामोरे गेले. त्यामध्ये बोलताना विराटने संघाची एकंदर परिस्थिती तसेच बायो-बबल याविषयी प्रश्नांची उत्तर देताना म्हटले,
“बऱ्याच काळापासून आम्ही सगळे खेळाडू ज्या प्रकारच्या वातावरणात राहतोय त्यामध्ये खेळाडूंत उत्साह टिकवून ठेवणे आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे गरजेचे आहे. रोज आपल्याला एकसारखी जीवनशैली जगावी लागत आहे. त्यामुळे भविष्यात एका देशाचे दोन संघ वेगवेगळ्या ठिकाणी खेळणे, हे नेहमी होत राहील. दोन संघ खेळणार म्हटल्यावर दोन कर्णधार लागणारच आहे.” यासोबतच विराटने संघाच्या तयारीविषयी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याबाबतही आपली मते मांडली.
भारताचा दुसरा संघ खेळणार श्रीलंकेत
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर भारतीय संघाला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, मधल्या काळात भारतात येण्यापेक्षा इंग्लंडमध्येच राहून या मालिकेची तयारी भारतीय संघ करेल.
भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये असताना आणखी एक संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. हा दौरा जुलै महिन्यात खेळला जाईल. माजी भारतीय खेळाडू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड या संघाचे प्रशिक्षक असतील.
महत्वाच्या बातम्या:
न्यूझीलंडच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणार, वेगवान गोलंदाजाला विश्वास
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या गोष्टीवर रवी शास्त्री नाराज, आयसीसीला सुचवला बदल
वडिलांच्या जन्मदिनी एबी बनला गायक, मॅक्सवेलने खेचली टांग