जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध टी२० लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगला ओळखले जाते. आयपीएलमध्ये फक्त भारतातीलच नाही, तर संपूर्ण जगभरातील खेळाडू खेळताना दिसतात. त्यामुळेच या लीगचे चाहते जगभरात आहेत. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलच्या भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले होते. शास्त्री म्हणाले होते की, येत्या काळात एका वर्षात २ आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. यावर आता माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने रवी शास्त्रींच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने आयपीएलच्या भविष्याबद्दल आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितले. तो म्हणाला की, “एका वर्षात २ आयपीएल होतील. असे आता होणार नाही. मात्र, नंतर नक्कीच होईल. याची गरज आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. हे होईल की नाही, हा मोठा प्रश्न आहे. आता होणार नाही, पुढील ५ वर्षात होणार नाही. मात्र त्यानंतरच्या ५ वर्षात होईल. हे होणे १०० टक्के नक्की आहे की एक मोठी आयपीएल होईल, त्यात ९४ सामने असतील. यानंतर एक छोटी आयपीएल जो १ महिन्यात संपेल. यामध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध फक्त १-१ सामना खेळतील.”
“मार्केटच्या मागणीनुसार हे करावे लागेल. आयपीएल सुरू झाली, तेव्हा ८ संघांची स्पर्धा कशी होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. त्यानंतर १० संघ झाले. यापूर्वी ६० सामने झाले होते आणि यावेळी ७४ सामने झाले. २ वर्षानंतर आयपीएलमध्ये ९४ सामने होतील. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि आता आयपीएलला मोठे व्हायचे आहे,” असेही पुढे बोलताना आकाश चोप्रा म्हणाला.
आयपीएल मोठी झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावरही परिणाम होणे निश्चित आहे. यामुळे वनडे आणि टी२० मालिका कमी होऊ शकतात. या शक्यतेवर चोप्रा म्हणाला की, “वनडे क्रिकेटमध्ये अनेक देशांचा समावेश असलेल्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. माझ्या मते वनडेमधील द्विपक्षीय मालिका खूप कंटाळवाणी आहे. मला टी२० आणि कसोटी प्रकार सर्वात जास्त आवडतात. वनडे सामन्यांमध्ये बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात.”
विशेष म्हणजे, मागील एका दशकात संपूर्ण जगात टी२० लीगचा प्रसार वेगाने झाला आहे. आयपीएलव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, पाकिस्तानची पाकिस्तान सुपर लीग आणि बांगलादेशची बांगलादेश प्रीमिअर लीग या काही लोकप्रिय टी२० लीग आहेत. यामध्ये फक्त भारतीय खेळाडू सोडून संपूर्ण जगातील खेळाडू खेळतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘चार पेग मारल्यानंतर…’, रुटला सार्वकालिन महान खेळाडू म्हणताच नेटकऱ्यांनी ‘दादा’चा घेतला समाचार
हार्दिकवर धोनी आधीपासूनच मेहरबान, पहिल्या तीन सामन्यांमध्येच दिलेली ‘ही’ आनंदाची बातमी
असं काय झालं की, पुनरागमनानंतर हार्दिक पंड्याने पहिल्याच सराव सत्राला मारली दांडी, जाणून घ्या कारण