---Advertisement---

U19 WC: 9 चौकार, 4 षटकार! अफगाणिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये वैभव सूर्यवंशीची धमाकेदार फिफ्टी

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 6:21 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात १९ वर्षाखालील वनडे विश्वचषक २०२६चा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सुरू आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतासमोर अफगाणिस्तानने ३११ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ४ विकेट्स गमावत ५० षटकात ३१० धावा केल्या. यामुळे १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एका संघाने ३००चा आकडा पार केल्याची कामगिरी केली.

भारताने लक्ष्याचा पाठलागही त्याच तुफानी वेगाने केला. सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने २४ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या स्फोटक खेळीने भारताने ७ षटकातच ७० धावा पूर्ण केल्या. त्याच्या धावांचा वेग पाहता तो शतकी खेळी करतो की काय असे वाटत असताना तो ६८ धावसंख्येवर बाद झाला. त्याने ३३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकार मारले.

वैभवने ऍरॉनसोबत पहिल्या विकेटसाठी ५७ चेंडूत ९० धावांची भागीदारी केली. त्याच्या विकेटनंतर ऍरॉनने कर्णधार आयुष म्हात्रे सोबत संघाचा धावफलक हलता ठेवला आहे. दोघांचाही स्ट्राईक रेट ९०च्या पुढे आहे. सध्या खेळपट्टीवर आयुष २२ धावांवर आणि ऍरॉन जॉर्ज ३६ धावांवर खेळत आहे.

अफगाणिस्तानच्या डावामध्ये फैसल शिनोजादा आणि उझैरउल्ला नियाझी यांनी शतकी खेळी केल्या. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी दिपेश देवेंद्रने तोडली. त्याने फैसलला त्रिफळाचीत केले, तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. अफगाणिस्तानने २५०चा आकडा पार केला होता.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. संघाने गटातील सर्व तीन सामने जिंकत सुपर-६मध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुपर-६मधील चारही सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक वेळा भारताने विजेतेपद जिंकले आहेत. त्यांनी विक्रमी पाच वेळा या स्पर्धेते विजेतेपद जिंकले.

सध्याच्या स्पर्धेतील एक संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी पराभूत केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---