आयुष म्हात्रेच्या (Aayush Mhatre) नेतृत्वाखालील भारतीय संघ ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या ‘सुपर सिक्स’ सामन्यात आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील (IND vs PAK) हा रोमांचक सामना रविवार, 1 फेब्रुवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाईल. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे.
सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल. मात्र, पावसाळ्यामुळे सामन्यात व्यत्यय येईल का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्याच्या दिवशी बुलावायोमध्ये आकाश स्वच्छ असेल आणि दिवसभर कडक ऊन पडेल. तापमान साधारण 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल आणि 37 किमी/तास वेगाने वारे वाहतील. चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे पावसाची कोणतीही शक्यता नाही. म्हणजेच चाहत्यांना पूर्ण 100 षटकांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
सामना पावसामुळे किंवा इतर कारणाने रद्द झाला, तर सेमीफायनलमध्ये कोण जाणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. फक्त विजय पुरेसा नाही, तर त्यांना आपला नेट रन रेट (Net Run Rate) देखील सुधारावा लागेल. पाकिस्तानकडे सध्या 4 गुण आणि 1.484 रन रेट आहे. तर पाच वेळा चॅम्पियन राहिलेला भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. भारताकडे 6 गुण असून 3.337 असा जबरदस्त रन रेट आहे. भारतीय संघ हा सामना हरला किंवा सामना रद्द झाला, तरीही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश करेल.






