भारतीय अंडर-19 संघ या विश्वचषकातील आपला पुढचा सामना 27 जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबवर झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष भारताचा 14 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्यावर असेल. प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम प्रस्थापित करणारा वैभव या सामन्यातही दोन मोठे जागतिक विक्रम मोडीत काढू शकतो.
वैभवने आतापर्यंत ज्या ज्या स्पर्धेत भाग घेतला, तिथे त्याने शतक झळकावले आहे. या विश्वचषकात मात्र त्याला अजून शतकी खेळी करता आलेली नाही. जर त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शतक ठोकले, तर तो अंडर-19 वर्ल्ड कपच्या पाहिजे कपच्या इतिहासात शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरेल. यापूर्वी बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावून तो सर्वात तरुण अर्धशतकवीर ठरलाच आहे.
सध्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या विल मालाजुकच्या नावावर आहे (51 चेंडूंत शतक). वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक खेळण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो हा विक्रमही मोडू शकतो, अशी चाहत्यांना आशा आहे. आयपीएल 2025 आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आधीच अशी फटकेबाजी करून दाखवली आहे.
झिम्बाब्वेच्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत फॉर्मात असलेल्या वैभवला मोठी खेळी करण्याची सुवर्णसंधी आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याने दिलेल्या आक्रमक सुरुवातीमुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला होता.





