काल प्रो कबड्डीमध्ये इंटर झोनल चालेंज वीकच्या सामन्यात यु मुंबाने तमील थलाइवाज संघाचा अटातटीच्या सामन्यात ३३-३० असा पराभव केला.
या सामन्यात यु मुंबाकडून कर्णधार अनुप कुमारने सर्वाधिक ८ गुण मिळवले. तर कुलदीप सिंग याने पाच गुण मिळवले. तमील थलाइवाजसाठी अजय ठाकूर १० गुण आणि के. प्रपंजन ८ गुण यांचे तमील थलाइवाजला जिंकून देण्याचे प्रयन्त थोटके पडले.
या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेसाठी यु मुंबासंघासाठी प्रशिक्षक इ. भास्करन यांनी हजेरी लावली. पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्न उत्तर देताना त्यांनी सामन्यातील लहान मोठ्या गोष्टींचा उत्तम संगम करत आपली मते नोंदवली.
या सामन्याच्या सुरुवातीलाच यु मुंबाचा मुख्य रेडर काशीलिंग दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला होता.
या पत्रकार परिषदेत उत्तर देताना भास्करन म्हणाले,“हा विजय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आम्हाला जर या लीगमध्ये टिकून राहायचे असेल तर आम्हाला आमचे सर्व उर्वरित सामने जिंकले पहिजेत. “
पुढे बोलताना ते म्हणाले,” घरेलू संघ तमील थलाइवाज यांच्या खेळाडूंचे मी अभिनंदन करतो कारण त्यांनी या सामन्यात आम्हाला खूप चांगली लढत दिली. या मोसमात हा संघ नवखा आहे.
या संघात अनुभवाची कमतरता आहे. परंतु जसे जसे हे सामने खेळतील तसे या संघातील खेळाडूंना अनुभव मिळेल आणि हा संघ भविष्यात खूप चांगली कामगिरी करेल.”
काशीलिंग विषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,” सुरुवातीच्या सत्रात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. शेवटच्या काही मिनिटात सामना कोणत्याही बाजूने झुकला जाण्याची चिन्हे असताना तो दुखापतग्रस्त असून मैदानात परतला.
त्याच्या ऐवजी बदली खेळाडू खेळवावे असे आम्हाला वाटत होते.परंतु काशीलिंगने सामन्यात परतण्याचे संकेत दिले आणि मोक्याच्या वेळी गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचे सहकार्य केले.”
यु मुंबाच्या डिफेन्सबद्दल बोलताना ते म्हणाले,’ आमच्याकडे खूप अनुभवी डिफेन्स आहे. या सामन्यात कुलदीप यादवने खूप उत्तम खेळ केला. त्याने केलेल्या सुपर टॅकलमुळे सामना आमच्याकडे झुकण्यास मदत झाली. तुमच्या अनुभवी डिफेंडर्सच्या जोरावर आम्ही सामन्यात पुढे राहिलो.”