नवी दिल्ली – यू मुम्बाने प्रतिभावंत खेळाडू मानव ठक्करला आगामी अल्टिमेट टेबलटेनिस (यूटीटी) 2024 हंगामासाठी कायम (रिटेन) ठेवले. मानवसह आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू मनिका बत्रा या पाच प्लेअर्सना त्यांच्या संबंधित फ्रँचायझींनी रिटेन केले आहे. यंदाची स्पर्धा 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 दरम्यान चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये खेळली जाणार आहे.
गेल्या मोसमातील उपविजेत्या चेन्नई लायन्सने दिग्गज खेळाडू शरथ कमलचा करार कायम ठेवला. बेंगळुरू स्मॅशर्सने सर्वोच्च रँकिंगवर असलेली भारताची अव्वल टेबलटेनिसपटू बत्रा हिच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. एकूणच सर्वच फ्रँचायझींनी आगामी हंगामासाठी त्यांच्या अव्वल पॅडलर्ससोबत राहणे पसंत केले.
भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या (टीटीएफआय) संयुक्त विद्यमाने नीरज बजाज आणि विटा दानी यांनी प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित यूटीटी लीग, 2017 मध्ये स्थापन झाल्यापासून भारतातील टेबलटेनिससाठी गेम चेंजर ठरली आहे. यूटीटी लीग आठ फ्रँचायझी संघांची आहे. या लीगमुळे भारतातील युवा आणि प्रतिभावंत पॅडलर्सना जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत त्यांची गुणवत्ता आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. स्पर्धेचा दर्जा वाढवणे आणि खेळातील उदयोन्मुख प्रतिभेच्या वाढीला चालना देणे, हा लीगचा प्रमुख उद्देश आहे.
गतविजेत्या गोवा चॅलेंजर्सने गेल्या मोसमात त्यांच्या जेतेपदात मोलाची भूमिका बजावलेल्या हरमीत देसाईला कायम ठेवले आहे. सथियान ज्ञानसेकरनचा दबंग दिल्ली टीटीसीसोबत करार कायम आहे
“गेल्या काही वर्षांपासून, फ्रँचायझींनी केवळ विजेतेपद मिळवण्याकडे लक्ष दिले नाही तर संघाचे नेतृत्व करू शकणाऱ्या त्यांच्या स्टार खेळाडूभोवती त्यांच्या संघाचा गाभा तयार करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. यूटीटी 2024 हंगामासाठी पाच फ्रँचायझीनी त्यांच्या स्टार परफॉर्मर्सला आणखी एका हंगामासाठी कायम ठेवण्यात हीच विचार प्रक्रिया दिसून येते,” असे यूटीटी प्रमोटर नीरज बजाज आणि विटा दानी यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
लीगच्या नियमांनुसार, विद्यमान सहा फ्रँचायझींना एका भारतीय खेळाडूला कायम ठेवण्याची परवानगी होती. त्यात पुणेरी पलटण टेबलटेनिसने कोणताही खेळाडू कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रवेश करणारे जयपूर पॅट्रियट्स आणि अहमदाबाद एसजी पायपर्स हे संघ त्यांच्या पसंतीच्या खेळाडूची निवड प्लेअर ड्राफ्टच्या पहिल्या फेरीत करतील. पहिल्या फेरीत फक्त तीन निवडी असतील.
नवीन हंगामाची सर्व आठ फ्रँचायझींनी कोच ड्राफ्टमधून एक परदेशी आणि एक भारतीय प्रशिक्षक निवडून उलटी गिनती सुरू केली आणि आता सहा खेळाडूंचे संघ तयार करण्याचा विचार केला जाईल. ज्यात चार भारतीय आणि दोन परदेशी (एक पुरुष आणि एक महिला) खेळाडू असतील.
नवीन हंगामात आणखी दोन संघांच्या समावेशामुळे स्पर्धेच्या स्वरूपामध्येही बदल होणार आहे. आठ संघ आता प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात विभागले जातील. प्रत्येक फ्रँचायझी लीग टप्प्यात पाच सामने खेळेल, त्यांच्या संबंधित गटातील इतर तीन संघांना आणि दुसऱ्या गटातून रँडमली (यादृच्छिकपणे) निवडलेल्या दोन संघांना एकदा सामोरे जावे लागेल. त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
कायम ठेवलेले (रीटेन) खेळाडू:
चेन्नई लायन्स : शरथ कमल
दबंग दिल्ली टीटीसी: सथियन ज्ञानसेकरन
गोवा चॅलेंजर्स : हरमीत देसाई
पीबीजी बेंगळुरू स्मॅशर्स: मनिका बत्रा
यू मुम्बा टीटी: मानव ठक्कर
(पुणेरी पलटण टेबलटेनिस, जयपूर पॅट्रियट्स आणि अहमदाबाद एसजी पायपर्स प्लेअर ड्राफ्टच्या पहिल्या फेरीत त्यांच्या आवडीचा खेळाडू निवडतील. पहिल्या फेरीत फक्त तीन निवडी असतील)