प्रो कबड्डी आज पुन्हा महाराष्ट्रीयन डर्बीचा थरार अनुभवणार आहे. आज प्रो कबड्डीमधील सर्वात लोकप्रिय यु मुंबा आणि यंदाचे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारे पुणेरी पलटण भिडणार आहेत. या मोसमात अगोदर या दोन संघात एक लढत झाली होती त्यात पुणेरी पलटणने बाजी मारली होती.
पुणेरी पलटणने या मोसमात खेळलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामने जिंकले असून दोन सामन्यात या संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे. एक सामना हा संघ गुजरात विरुद्ध हरला होता तर दुसरा सामना या संघाने जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध गमावला होता. पुणेरी पलटणचा संघ जे सामने जिंकला आहे त्या सामन्यात या संघाने विरोधी संघाला जास्त संधी दिलेली नाही. या संघाचा डिफेन्स यांची जमेची बाजू आहे. रेडींगमध्ये दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत तर डिफेन्समध्ये संदीप नरवाल, गिरीश एर्नेक, धर्मराज चेरलाथन यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
यु मुंबा संघ यावेळी स्थिरावलेला नाही, या संघाच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. या संघाने खेळलेल्या सात सामन्यात तीन विजय मिळवले आहेत तर बाकीच्या चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. या संघाची जमेची बाजू असणाऱ्या रेडींगमध्ये हा संघ गुण मिळवण्यात अपयशी ठरत आहे. प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे रेडर असणारे अनुप कुमार आणि काशीलिंग आडके यांना या मोसमात आपली छाप पाडता आली नाही. डिफेन्स या संघाची जमेची बाजू नसली तरीही या विभागात देखील या संघाला खुप सुधारणा करावी लागेल.
या सामन्यासाठी पुणेरी पलटणकडे विजयाची थोडी जास्त संधी आहे. तरीही घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि प्रेक्षकांचा मिळणार पाठिंबा यु मुंबासाठी प्रेरक ठरू शकतो. यु मुंबाला जर सलग तीन सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करायची नसेल तर हा सामना जिंकावाच लागेल. हा सामना जिंकून मागील लढतीवेळी झालेल्या पराभवाची परतफेड करून विजयी लयीत परतण्यासाठी यु मुंबा सामन्यात उतरेल.