---Advertisement---

U19 WC: 15 चौकार, 2 षटकार अफगाणिस्तानविरुद्ध एरॉन जॉर्जचे शतक! पंतचा विक्रम मोडीत, तर चेतेश्वर पुजाराचा रेकॉर्ड वाचला

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 8:47 AM
---Advertisement---

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकात बुधवारी (४ फेब्रुवारी) झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताने ३११ धावसंख्येचा पाठलाग केला. ज्यामध्ये भारताचा सलामीवीर एरॉन जॉर्जने शतकी खेळी करत संघाचा विजय सोपा केला. त्याच्या या शतकी खेळीने उन्मुक्त चंद आणि रिषभ पंतचा विक्रम मोडला गेला, तर भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराचा विक्रम वाचला.

जॉर्जने १०४ चेंडूत १५ चौकार आणि दोन षटकार मारत ११५ धावा केल्या. या सामन्याचा ‘प्लेयर ऑफ दी मॅच’चा पुरस्कारही त्यालाच मिळाला. त्याचबरोबर तो बाद फेरीत शतकी खेळी करणारा भारताचा नववा फलंदाज ठरला. तसेच नॉकआऊटच्या सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक खेळी करताना त्याने उन्मुक्त चंद आणि रिषभ पंतला मागे टाकले आहे. पंत आणि चंद यांनी भारताकडून खेळताना विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात प्रत्येकी १११-१११ धावांची खेळी केली. या यादीत पहिल्या स्थानावर चेतेश्वर पुजारा आहे. त्याने २००६च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद १२९ धावा केल्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना जॉर्जसोबत वैभव सूर्यवंशीनेही भारताला उत्तम सुरूवात करून दिली. वैभवने २४ चेंडूतच अर्धशतक केले. तो ३३ चेंडूत ६८ धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार आयुष म्हात्रेने जॉर्जला चांगली साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. आयुष ६२ धावा करत बाद झाला.

जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी उत्तम शॉट्स खेळत संघाचा धावफलक हलता ठेवला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची (७९ चेंडू) भागीदारी केली. जॉर्ज बाद झाल्यावर विहानने वेदांत त्रिवेदीच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला.

या स्पर्धेतील अंतिम सामना ६ फेब्रुवारीला खेळला जाणार असून यामध्ये पाच वेळेचा चॅम्पियन भारत- इंग्लंडशी भिडणार आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषकाच्या नॉकआऊटमध्ये भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारे-
नाबाद १२९ धावा – चेतेश्वर पुजारा वि. इंग्लंड, २००६ उपांत्य सामना
११५ धावा – एरॉन जॉर्ज वि. अफगाणिस्तान, २०२६ उपांत्य सामना
१११ धावा – उन्मुक्त चंद वि. ऑस्ट्रेलिया, २०१२ अंतिम सामना
१११ धावा – रिषभ पंत वि. नामिबिया, २०१६ उपांत्यपूर्व सामना
११० धावा – यश धूळ वि. ऑस्ट्रेलिया, २०२२ उपांत्य सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---