सध्या यूएईत खेळल्या जात असलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषकात (U19 ASIA CUP 2021) भारतीय संघाने सोमवारी अप्रतिम प्रदर्शन करून अफगाणिस्तान संघावर विजय मिळवला. २७ डिसेंबरला पार पडलेल्या या सामन्यात भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (u19 team india) अफगाणिस्तान १९ वर्षाखालील संघाला चार विकेट्स राखून पराभूत केले. या विजयानंतर भारताचे आशिया चषकाच्या उपांत्य सामन्यातील स्थान पक्के झाले आहे. दरम्यान, अफगाणिस्तान जरी या सामन्यात पराभूत झाला असला, तरी त्यांच्या एका फलंदाजाने डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केले.
अफगाणिस्तान संघाचा इजाझ अहमदने (ijaz ahmad ahmadzai) या सामन्यात नेत्रदीपक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने खेळलेल्या ६८ चेंडूत तब्बल ८६ धावा केल्या. या धावा करण्यासाठी अहमदने चौकार कमी आणि षटकार जास्त ठोकले. त्याने एक चौकार आणि तब्बल सात षटकारांच्या जोरावर ही कामगिरी केली. यादरम्यान अहमदने डावाच्या शेवटच्या षटकात भारताच्या राजवर्धन हंगारगेकरची खूपच धुलाई केली. डावाच्या शेवटच्या षटकाता अहमदने तब्बल तीन षटकार ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तान संघाच्या धावसंख्येत शेवटच्या षटकात २७ धावांची भर पडली. अहमदव्यतिरिक्त खैरत अलीने शेवटच्या षटकात एका चौकाराचे योगदान दिले.
तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात काही खास झाली नव्हती. अफगाणिस्तानने पहिल्या १९ षटकात ६३ धावा करत दोन विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर २९ व्या षटकात संघाची धावसंख्या तीन बाद १०१ होती. परंतु त्यानंतर कर्णधार सुलेमान सफीने इजाझ अहमदसोबत ८८ धावांची भागीदारी केली. सुलेमानने ८६ चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शेवटच्या काही षटकांमध्ये संघातील खेळाडूंनी केलेल्या प्रदर्शनामुळे अफगाणिस्तानने २५९ धावांचा टप्पा गाठला. मात्र, भारतीय संघाने त्यांचे हे आव्हान मोडीत काढले.
शेवटच्या षटकात २७ धावा दिलेल्या राजवर्धनसाठी हा सामना निराशाजनक राहिला. शेवटच्या षटकात धुलाई झाल्यामुळे त्याने संपूर्ण सामन्यात टाकलेल्या १० षटकात ७४ धावा खर्च केल्या आणि संघासाठी महागात पडला. यादरम्यान त्याने एक विकेटही घेतली. विकी ओत्सवाल (१-३५) आणि कौशल तांबे (१-२८) यांनी भारतासाठी किफायतशीर गोलंदाजी केली.
दरम्यान, भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात चार विकेट्सच्या नुकसानावर २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ४८.२ षटकात आणि सहा विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय अंडर १९ संघाची आशिया कपच्या उपांत्य फेरीत धडक; जुन्नरचा कौशल ठरला सामनावीर
दीपक हूडाच्या ‘मॅचविनिंग’ रेडने जयपूरचा यूपीवर रोमांचक विजय
तमिल थलाइवाजने हिसकावला यु मुंबाच्या विजयाचा घास; अखेरच्या रेडवर सामना ‘टाय’
व्हिडिओ पाहा –