---Advertisement---

U19 WC: अंडर 19 वर्ल्ड कपचे संघ ठरले! जाणून घ्या कुठे पाहता येणार सामना

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 10:19 PM
---Advertisement---

आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश करणारे दोन्ही संघ ठरले आहेत. या स्पर्धेतील सेमीफायनल फेरीतील दुसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर विजयासाठी विक्रमी ३११ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५३ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. यासह दहाव्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा फायनलचा सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. दरम्यान हा सामना लाईव्ह केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.

या स्पर्धेतील फायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. भारतीय संघाने अफगाणिस्तानला पराभूत करून स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडने ५० षटकांअखेर ७ गडी बाद २७७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव २५० धावांवर आटोपला.

या स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाईल. हा सामना शुक्रवारी ६ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक १२:३० वाजता होईल. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जिओ हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. हा सामना हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने दहाव्यांदा या स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतीय संघ इंग्लंडला हरवून जेतेपदाची ट्रॉफी उंचावणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून फैजल खानने ११० धावांची दमदार शतकी खेळी केली. तर उजैरूल्लाह निआजईने १०१ धावा केल्या. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ४ गडी बाद ३१० धावांचा डोंगर उभारला. याआधी अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कुठल्याही संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी विक्रमी आव्हानाचा पाठलाग करायचा होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या आरोन जॉर्जने ११५ धावांची खेळी केली. तर वैभव सूर्यवंशीने ६८ धावा केल्या. तर कर्णधार आयुष म्हात्रेने ६२ धावा केल्या. शेवटी विहान मल्होत्राने ३८ धावांची खेळी करून भारतीय संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---