यूएई संघाचा कर्णधार मुहम्मद वसीमने (Muhmmed Vasim) आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025) ओमानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात फलंदाजी करताना जोरदार खेळी केली. डावाची सुरुवात करण्यासाठी उतरल्यावर वसीमने उत्कृष्ट फलंदाजी करत 54 चेंडूत 69 धावा केल्या. यादरम्यान वसीमने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये इतिहास रचला आहे.
त्याने एका खास बाबतीत वर्ल्ड क्रिकेटमधील अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. वसीमच्या दमदार खेळीमुळे यूएई संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 विकेट्स गमावून 172 धावा केल्या.
मुहम्मद वसीम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 3000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने हा टप्पा गाठण्यासाठी एकूण 1947 चेंडू खेळले. वसीमने जोस बटलरचा (Jos Buttler) रेकॉर्ड मोडला आहे. बटलरने 3000 धावा 2068 चेंडूत पूर्ण केल्या होत्या. यादीत आरोन फिंच तिसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्याने 2077 चेंडूत ही कामगिरी केली होती. वसीमने या कामगिरीत डेविड वॉर्नर आणि रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.






